Breaking News

करंजा गावात पाणीपुरवठा करण्याची महिला संघटनेची मागणी

उरण : प्रतिनिधी  : उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा गावात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून, पिण्याच्या पाण्याचे बॅरल अक्षरशः उरण शहरातून विकत आणावे लागत आहेत. त्यामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना या पाणीटंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करणार्‍या महिलांनी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे आणि उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निलिमा गाडे यांची भेट घेतली. या वेळी महिलांच्या शिष्टमंडळाने करंजा येथील पाणीटंचाई तत्काळ दूर करण्यासाठी दैनंदिन नळपाणी पुरवठा सुरू करण्याबाबत निवेदन दिले आहे. या गावातील सर्वाधिक नागरिक मासेमारी व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे घराघरात शौचालये आहेत. त्यामुळे पाण्याअभावी दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात होत असल्याची कैफियत या निवेदनात मांडण्यात आली आहे. शिवाय पाण्याअभावी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दुर्दैवाने करंजासारख्या सुमारे 25 हजार लोकवस्तीच्या गावात दैनंदिन पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या निवेदनात दैनंदिन पाणीपुरवठा अन्यथा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी या महिला शिष्टमंडळाने केली आहे. या वेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटील, सचिव अमिता ठाकूर, कमला म्हात्रे, प्रणाली पाटील, रजनी पाटील, निशा पांचाळ,  वर्षा कोळी, रोहिणी कोळी, निलम दहिवळकर, आरती पांचाळ व कौशल्या कोळी आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply