


पनवेल : वार्ताहर
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प.पू. सद्गुरु नाना महाराज परांजपे यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा पनवेल येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाला.
या वेळी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन झाले असता तिचे स्वागत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले व पालखीला प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने अभिनव स्वरगर्जना ढोलताशा पथक यांनी आपली कला सादर करून पनवेलकरांची मने जिंकली. त्याचप्रमाणे आळंदी व जालना परिसरातून आलेल्या वारकर्यांनी विविध भजने गाऊन संपूर्ण परिक्रमा भक्तीमय केली होती. या पालखीमध्ये मोठ्या संख्येने स्वामी सेवक सहभागी
झाले होते.
शहरातून ठिकठिकाणी ही पालखी फिरविण्यात आली. त्यावेळी अनेकांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली. तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांनी पालखीचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रायगड भूषण मठाधिपती सुधाकर (भाऊ) घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी काढण्यात आली होती. पनवेल महापालिकेेचे सभागृहनेते परेश ठाकूर आणि भाजप महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी या सोहळ्यास शुक्रवारी भेट दिली. या वेळी तालुका सरचिटणीस लिना पाटील, श्वेता खैरे उपस्थित होत्या.