अज्ञात ट्रकचालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा
माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेत रस्त्यालगत असणार्या घरांना व दुकानांना भरधाव ट्रकची धडक लागली. हा अपघात बुधवारी (दि. 22) रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद चिमणलाल भोगिलाल मेहता (वय 79) रा. इंदापूर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी चिमणलाल भोगिलाल मेहता तसेच इतर नागरिकांच्या घरांना व दुकानांना ट्रकवरील (क्र. सीजी 04 एनएम 9266) अज्ञात चालकाने इंदापूर गावच्या हद्दीत आल्यावर अतिवेगाने ट्रक चालवल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व रस्त्यालगत असलेल्या फिर्यादी व इतर नागरिकांच्या घरांना व दुकानांना धडक दिली, तसेच तो याबाबत पोलिसांत काही माहिती न देता तेथून पळून गेला.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोडकुलकर करीत आहेत.