
खोपोली : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था-रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील गावागावांमध्ये लोककलेतून आरोग्यविषयक जनप्रबोधन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील शिरवली, वावोशी, खालापूर बसस्थानक येथे लेक लाडकी या लोककलेतून जनसुरक्षा योजना, प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, आयुष्यमान भारत, शासकीय दवाखान्यातील सुरक्षित प्रसूती, पोषण आहार यांसह आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.कोरोनासंदर्भात घाबरू नका, परंतु सावध राहा. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रूमाल धरा. आपले हात वारंवार साबणाने धुवा. स्वतःच्या हातांचा आपले डोळे, नाक, तोंड, चेहरा यांना स्पर्श टाळावा. आपण सर्व काळजी घेऊ आणि कोरोनाला पळवून लावू, असे विविध विषय या वेळी हाताळण्यात आले. लोककलेचे नेतृत्व स्वयंसिद्धाच्या सेक्रेटरी तपस्वी गोंधळी यांनी केले. पथनाट्यात स्वप्नाली थळे, सुचित जावरे, विराज म्हात्रे, वेदांत कंटक, शीतल म्हात्रे, प्रांजली पाटील, प्रशांत शिंदे आदी सहभागी झाले होते.