महाड ः प्रतिनिधी
महाड शहरात अतिक्रमणाविरोधी कारवाईला पालिका प्रशासनाने सुरू केली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असताना काही दुकानांच्या वाढीव पत्र्याच्या शेड तोडण्यात आल्या आणि काहींना अभय देण्यात आले. याबाबत चौकशी केली असता, माजी नगरसेवक सुनील कविस्कर यांनी ज्या शेड तोडण्यात आल्या नाहीत, त्याबाबत नगरपालिकेत ठराव करण्यात आला आहे. त्या शेड तोडता येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेड न तोडता कारवाई पथक पुढे निघून गेले. बांधकाम विभागाचे अभियंता कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनीदेखील ठराव केला असावा, असे मोघम उत्तर देऊन शेड तोडण्यास टाळाटाळ केली.
शहरातील बहुतांश अतिक्रमणे तोडताना एकाला एक न्याय आणि दुसर्याला एक न्याय असे धोरण नेहमीच राबवले जाते, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.