Breaking News

शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर बडगा

नवी मुंबईत विनापरवाना बॅनरबाजीवर होणार कारवाई

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करण्यात येतात. त्यांच्यावर बडगा उगारण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीत विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. सदनिकांची विक्री, दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण अशा विविध विषयांचे विनापरवाना बॅनर शहराच्या हद्दीमध्ये लावण्यात येतात. अशा पोस्टर्सवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. शहराचे विद्रुपीकरण होते, त्याचबरोबर झाडांना इजा होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. मात्र अनेकदा कारवाईला विलंब होतो. त्यामुळे कोणीही विनापरवाना होर्डिंग्ज लावल्यास जागरूक नागरिकांनी तत्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, यासाठी महापालिकेकडून संबंधित अधिकार्‍यांना विभागवार टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. विनापरवानगी जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स आणि पोस्टर्स लावल्याचे आढळल्यास जागरूक नागरिकांनी त्याची माहिती व छायाचित्रे 8422955912 या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवावीत. महापालिकेच्या मुख्यालयामध्ये तक्रार करण्यासाठी 1800 222 309, 1800 222 310 आदी क्रमांकावर संपर्क साधून नागरिक तक्रार नोंदवू शकतात, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. विभाग अधिकार्‍यांचे दूरध्वनी क्रमांक, बेलापूर मिताली संचेती 1800 222 312, नेरूळ विनोद नगराळे 1800 222 313, वाशी सुखदेव येडवे 1800 222 315, तुर्भे सुबोध ठाणेकर 1800 222 314, कोपरखैरणे प्रशांत गावडे 1800 222 316, घणसोली शंकर खाडे 1800 222 317, ऐरोली महेंद्र सप्रे 1800 222 318, दिघा मनोहर गांगुर्डे 1800 222 319 असे असून जर का कोणी विनापरवानगी जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स आणि पोस्टर्स लावल्याचे आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply