Breaking News

…अन्यथा देवळे धरणामुळे घात झाला असता!

पोलादपूर तालुक्यातील देवळे धरण पूर्ण होऊनही अद्याप पाणी साठवून ठेवण्यात यश आलेले नाही. राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी लघुपाटबंधारे स्थानिक स्तर उपविभाग माणगाव जि.रायगडच्या माध्यमातून सन 2008-2009 दरम्यान तयार केलेल्या टिपणी अहवालानुसार पोलादपूर तालुक्यातील विविध धरणांबाबत देवळे लघुपाटबंधारे योजना, लोहारे लघुपाटबंधारे योजना, तुर्भे खोंडा लघुपाटबंधारे योजना, किनेश्वरवाडी लघुपाटबंधारे योजना, चांभारगणी महाळुंगे लघुपाटबंधारे योजना, कोतवाल लघुपाटबंधारे योजना, कोंढवी साठवण तलाव आणि बोरघर लघुपाटबंधारे योजना सुरू होण्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात आला होता. यापैकी देवळे लघुपाटबंधारे योजना अनेक वर्षांपासून रखडलेली असूनही त्या योजनेचा समावेश या लघुपाटबंधारे अहवालात करण्यात आला होता. मातीबंधारा असलेल्या या बंधार्‍याचे धरण मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम सक्षमपणे करण्यात आले नसल्याने या धरणामुळे तिवरे धरणाची पुनरावृत्ती होऊ शकण्याच्या भितीने यापूर्वीच्या दोन तहसिलदारांनी पाहणी केली होती. गेल्या वर्षी 22 जुलै 2021च्या रात्री देवळे धरणाने घात केला असता. चक्क या धरणाच्या वॉचमनने धरणाचा पाणीसाठा सोडल्याने धरण बचावले आणि अनेकांचा जीव जाणे टळले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली. या मुळे अर्धवट अवस्थेतील धरणप्रकल्प पूर्ण करण्यात शासनाने टाळाटाळ केली तर जलसिंचन किती होईल यापेक्षा किती जणांचे जीव जातील, हाच खरा प्रश्न निर्माण होत आहे. देवळे लघुपाटबंधारे योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता 31 मार्च 1981 रोजी केवळ 32 लाख 60 हजार 496 रूपयांची असून एप्रिल 1994 मध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे ही योजना हस्तांतरीत झाली तेव्हा कामासाठी 1 कोटी 66 लाख 52 हजार 294 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 42 लाख 2 हजार 890 रूपये अशी एकूण 2 कोटी 8 लाख 55 हजार 184 रूपये अशी सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली.  योजनेच्या दुसर्‍या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामासाठी 4 कोटी 68 लाख 1 हजार 876 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 68 लाख 96 हजार 855 रूपये अशी एकूण 5 कोटी 36 लाख 98 हजार 731 रूपये अशी मंजूरी 31 मार्च 2005 रोजी मिळाली. देवळे लघुपाटबंधारे योजनेचे काम ब-1 निविदांवर तीन टप्प्यांत पुणे येथील कंपन्यांना देण्यात आले. या कामाची सुरूवात मार्च 1997मध्ये झाली. मात्र बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी 1998मध्ये योजनेचे काम बंद होते. यानंतर एस.पी.रेड्डी यांना विभागीय कार्यालयामार्फत पत्र देऊन सबलेटिंग करण्यास मंजूरी दिली. साधारणत: 2001 मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे 2003मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरूवात केली. देवळे लघुपाटबंधारे धरण प्रकल्प योजनेच्या दुसर्‍या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामासाठी 4 कोटी 68 लाख 1 हजार 876 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 68 लाख 96 हजार 855 रूपये अशी एकूण 5 कोटी 36 लाख 98 हजार 731 रूपये अशी मंजूरी 31 मार्च 2005 रोजी मिळाली. या कामाची सुरूवात मार्च 1997 मध्ये झाली.  मात्र बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी 1998 मध्ये योजनेचे काम बंद केले होते. 2001मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना काही प्रमाणात भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे 2003मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरूवात केली. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतल्या-घेतल्याच धरणाची गळती सुरू झाल्याची माहिती माजी सरपंच तुकाराम केसरकर यांनी दिली आहे.

-शैलेश पालकर

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply