भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेवर पलटवार
जालना:प्रतिनिधी
आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढलं की ते पळून गेले, याचा निर्णय जनतेने करावा. लग्न आमच्याशी ठरलं होतं. मात्र ते दुसर्यांसोबत पळून गेले.असा घणाघाती आरोप भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाआहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र यांची गाडी रुळावर येत नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. ते पुढे म्हणाले, स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्हाला सोडून दिले एका मुख्यमंत्रीपदामुळे त्यांचे सर्व आमदार-खासदारदेखील नाराज आहेत.
भोकरदन तालुक्यातील राजूर येथे दानवे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौर्यावर जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौर्यासाठी शिवसेनेकडून सुरू असलेल्या बॅनरबाजीवर देखील रावसाहेब दानवे यांनी टीका केली.
कोण असली आणि कोण नकली याचा फैसला करण्याचा अधिकार मतदाराला आहे. येणार्या निवडणुकीत जनताच याचा फैसला करेल, असा पलटवार दानवेंनी केला.
याबरोबरच मुख्यमंत्री यांच्या अच्छे दिनाच्या वक्तव्यावर देखील दानवेंनी टीका केली. जनतेने भाजप-सेनेला मतदान केले. मात्र तुम्ही बगावत केली. धोका देत सत्तेसाठी आम्हाला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेलात मुख्यमंत्री झाला, तुम्हाला तर अच्छे दिन आले. मात्र त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला बुरे दिन आले, असा टोला दानवे यांनी लगावला. यावेळी रावसाहेब दानवे यांना ओबीसी आरक्षणाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. इम्पेरिकल डेटाशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. इम्पेरिकल डेटा द्या, अशी कोणतीही सूचना कोर्टाकडून केंद्राला आलेली नाही. कोर्टा जेव्हा राज्य सरकारकडे इम्पेरिकल डेटा मागत आहे तेव्हा ती राज्य सरकारची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.
सर्व पातळीवर राज्य सरकार अपयशी
राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलेलं आहे. वीजेचं संकट, कोविडचा काळ, मराठा समाजाचे आरक्षण, धनगर किंवा ओबीसींचे आरक्षण असूद्या, सर्वच ठिकाणी हे सरकार अपयशी ठरले. हे सरकार ज्या ज्या वेळी अपयशी ठरलें त्यावेळेस त्यांनी केंद्र सरकारवर खापर फोडलं. ओबीसी समाजावर अन्याय करणं हे राज्य सरकारचं धोरणच आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली