भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड गावालगतच्या डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केल्यानंतर प्रशासनाने शनिवरी ग्रामस्थांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आषाढातील कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होण्यासाठी पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई आणि पोलीस कर्मचार्यांना ग्रामस्थांच्या मिन्नतवार्या कराव्या लागल्या. त्यानंतर रविवारी (दि. 24)ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले.
वडाचा कोंड गावातील शेतकरी सतीश बांदल शनिवारी सकाळी बकर्या आणि गुरांना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेले असता त्यांना तेथे भेगा पडल्याचे आढळले. ही बातमी त्यांनी चरई ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुशांत कदम आणि पोलादपूर तहसील कार्यालयाच्या आपत्ती निवारण कक्षाला कळविली. त्यानंतर महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई, तलाठी सुनील वैराळे यांनी तातडीने एनडीआरएफच्या जवानासह घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ चरई वडाचाकोंड येथील ज्ञानेश्वरवाडी व हनुमानवाडी ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या.
प्रशासनाने त्यासाठी ग्रामस्थांची बैठक बोलावली होती. त्यात आषाढातील कामिका एकादशीचे भजन, किर्तन झाल्यानंतर आणि उपवास सोडल्यानंतर घरातून बाहेर पडण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शविली. ग्रामस्थांना डोंगराला पडलेल्या भेगांपेक्षा एकादशीव्रताचे माहात्म्य अधिक असल्याचे दिसून आल्याने पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय आंधळे तसेच महाड कन्ट्रोलचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पवार आणि पोलीस कर्मचार्यांना चक्क ग्रामस्थांच्या मिन्नतवार्या कराव्या लागल्या. त्यानंतर सुमारे दीडशेपैकी 75 ग्रामस्थांना रानवडीच्या मंदिरामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आणि सुमारे 67 ग्रामस्थांनी आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला. या वेळी प्रशासनाकडून रानवडीच्या मंदिरात ग्रामस्थांना साबुदाण्याची खिचडी तसेच शाकाहारी जेवण देण्यात आले. मात्र, रात्री सर्वांनाच मच्छरांनी हैराण केल्याने सोमवारची सकाळ उजाडताच सर्वजण आपआपल्या घराकडे तातडीने परतले.