Breaking News

तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करणार्यास बेड्या

अलिबाग पोलिसांनी केली चिमुरड्याची सुटका

अलिबाग, पेण : प्रतिनिधी

अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला पळवून नेणार्‍या लफंग्याला अलिबाग पोलिसांनी काही तासातच मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या तावडीतून त्या बालकाची सुटका करून त्याला आईच्या ताब्यात दिले. बाळ हातात येताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मधुकर नारायण पारधी असे आरोपीचे नाव आहे. तो अलिबाग तालुक्यातील भोपोली इथला राहणारा असून कुरूळ इथं मजुरीच्या कामासाठी येत असे. तिथे त्याची संदीप नाईक यांच्या कुटुंबाशी ओळख झाली. संदीप नाईक यांचा तीन वर्षांचा मुलगा संदेश घरात एकटाच होता. नाईक व त्यांची पत्नी कविता हे कामानिमित्त बाहेर होते. त्याचा फायदा घेत मधुकर याने संदेशला पळवून नेले. संध्याकाळी घरी आल्यावर संदेश घरात नाही हे पाहून आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो कुठेच सापडला नाही, म्हणून अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सुरूवातीला वाडगाव, त्यानंतर आरोपी रहात असलेल्या भापोली गावात जावून चौकशी केली. तेव्हा मधुकर पेण तालुक्यातील आसाने या त्याच्या सासरवाडीच्या गावी गेला असावा, अशी माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी रात्रीच आसाने गाठले. तेथील  आदिवासी वाडीवरून आरोपी मधुकर याला ताब्यात घेतले आणि संदेशला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. अलिबागचे पोलीस निरीक्षक एस. डी. सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक शशिकांत सुतार, अतुल मैंद, सुनील फड, उदय सावंत आदींनी या कारवाईत भाग घेतला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply