कर्जत : बातमीदार
कर्जत विधानसभा मतदारसंघात आपला हक्काचा आमदार निवडून आणण्यासाठी जनतेनेच बदलाची सुरुवात केली असून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे काढलेल्या प्रचार फेरीत ते बोलत होते. राज्यात युतीचे सरकार येणार आहे. कर्जतचा मतदार या वेळी परिवर्तन करणार असल्याने येथेही महायुतीचाच विजय होणार असल्याचा दावा दळवी यांनी या वेळी केला. वेणगाव पंचायत समिती गण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे या वेळीही भारतीय जनता पक्ष सेनेसोबत असल्याने या भागातून महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास वेणगावचे ग्रामस्थ आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी या वेळी व्यक्त केला, तर या भागातील रहिवासी असलेले भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांनी मागील पाच वर्षांत भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल, असे सांगितले. कर्जत मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी बीड जिल्हा परिषद गटातील वेणगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये काढलेल्या प्रचारफेरीत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी, जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा मतदारसंघाचे संघटक संतोष भोईर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.