बेकायदेशीर भंगार गोदामांकडून शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन राजरोसपणे केले जात आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. महाड शहरातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील भंगार व्यावसायिक अनधिकृतपणे जुन्या वाहनांची तोड करत असून याठिकाणी काम करणार्या कामगारांच्या सुरक्षेबाबत देखील विचार केला जात नसल्याचे दिसून येत आहे. भंगार गोळा करण्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालत आहे. गोरगरिबांच्या जीवावर काही भंगार व्यावसायिक मात्र गलेलठ्ठ झाले आहेत. या भंगार व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे वाहनांची तोडकाम करणे, रासायनिक कचरा घेणे, घरगुती सिलिंडर वापर करणे, आदी कामे बिनदिक्कत केली जात आहेत. परप्रांतीय असलेल्या या भंगार व्यावसायिकांकडून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यातून भंगार व्यावसायिक आणि कामगार याठिकाणी आपला तळ ठोकून आहेत. औद्योगिक क्षेत्र तसेच महाड शहरात या व्यावसायिकांनी काहींच्या आशीर्वादातून जागा भाडे तत्वावर घेवून व्यवसाय उभे केले आहेत. मात्र याठिकाणी कोणतीच खबरदारी घेतली जात नसून संबंधित शासकीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आहेत. महाड शहरात किमान सहा ते सात तर तालुक्यात पंधरा वीस भंगाराचे गोदामे आहेत. शहरात प्रवेश करणार्या प्रमुख मार्गावर हे व्यावसायिक असून या गोदामांवर शहर तसेच ग्रामीण भागातून गोळा करून आणलेले भंगार स्वीकारले जाते. बहुतांश परप्रांतीय नागरिक या व्यवसायात असून ग्रामीण भागात भंगार घेवून आईस्क्रीम, भांडी, कपडे दिले जातात तर शहरात रोख रक्कम देवून भंगार खरेदी केले जाते. या भंगार व्यावसायिकांकडून गोळा करून आणणार्या व्यक्तीकडून कमी पैशात भंगार घेवून विक्री मात्र बाजारभावाप्रमाणे केली जात असल्याने सर्वसामान्य, गोरगरिबांच्या पोटावर भंगार व्यावसायिक मात्र गलेलठ्ठ झाले आहेत. ज्या भाड्याच्या जागेत ही गोदामे आहेत त्या ठिकाणी इमारत नसताना देखील आणि कागदपत्रांचा पत्ता नसताना देखील वीज पुरवठा करण्यात आला आहे. हा वीज पुरवठा करताना देखील महावितरणकडून लाकडी काठ्यांचा आधार देत वीज पुरवठा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय स्थानिक प्रशासनाकडून देखील विचारणा होत नसल्याने भंगार गोदामांवर पाणी पुरवठादेखील केला गेला आहे. सर्वसामान्य माणसाला कामे करताना शासकीय नियमांची आडकाठी समोर येते. मात्र या भंगार व्यावसायिकांना कशा परवानग्या आणि सोयीसुविधा दिल्या, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महाड शहरात असलेल्या प्रमुख मार्गांच्या शेजारीच भंगार गोदामे आहेत. या भंगार गोदामांवर आणि परिसरात अस्वच्छ वातावरण आहे. जागोजागी पडलेले भंगाराचे तुकडे, ड्रम, जुन्या टाक्या आदींमुळे ऐन पावसाळ्यात पाणी साचून डेंग्यूचा प्रसार होण्यास मदत होते. एकीकडे महाड नगरपालिका आरोग्य विभाग सर्वसामान्य नागरिकांला घरात किंवा घराशेजारी ठेवलेल्या कुंडीत अगर ड्रममध्ये पाणी साचून ठेवल्यास कारवाई केली जाते. मात्र भंगार गोदामांवर ऐन पावसाळ्यात साचलेल्या पाण्याबाबत आणि गलिच्छ वातावरणावर कोणतीच कारवाई केली जात नाही. याच ठिकाणी भंगार गोदामांवर काम करणारे कामगारदेखील राहतात. औद्योगिक क्षेत्रात तर रासानिक ड्रम, रासायनिक पावडरच्या पिशव्या, साठवून ठेवल्या जातात. या पिशव्या किंवा ड्रम हे कामगार असुरक्षितपणे बाळगतात. यामुळे यापूर्वी अनेक अपघातदेखील झाले आहेत. परिसरात यामुळे रसायन सांडून जमिनीची सुपिकता आणि शेती धोक्यात असताना देखील जागा मालकाशी करार करून कोणत्याच प्रकारची शासकीय परवानगी न घेता या भंगार व्यावसायिकांनी तळ ठोकले आहेत. भंगार गोदामांवर अनधिकृतपणे वाहनांची तोड होत असते. बहुतांश भंगार व्यावसायिकांकडून जुनी वाहने भंगार म्हणून घेतली जातात. परिवहन विभागाची रीतसर परवानगी न घेताच वाहन मालकदेखील आपली वाहने भंगार व्यावसायिकांना देतात. भंगार व्यावसायिकदेखील परिवहन विभागाच्या कोणत्याच परवानग्या न काढता आपल्या कामगारांकडून वाहन तोडून नष्ट करतात. जुने वाहन नष्ट झाले असले तरी संबंधित विभागाकडे मात्र या वाहनांची नोंद कायम राहते. किंवा या नंबर प्लेटचा वापरदेखील केला जाण्याची शक्यता असते. प्रत्येक महिन्याला शहरात परिवहन विभागाचा कॅम्प असून देखील आर.टी.ओ.कडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. भंगार व्यावसायिकांकडून होत असलेल्या अनधिकृत कामांची तपासणी करून कारवाई होणे आवश्यक आहे.
– महेश शिंदे