Breaking News

दिवेआगर मंदिरात मंगळवारी गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना

अलिबाग : प्रतिनिधी

अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून  येत्या मंगळवारी (दि. 23) दिवेआगर येथील मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील मंदिरातून 23 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांचा खून करून सुवर्ण गणेशाचा मुखवटा व दागिने मिळून एक किलो 600 ग्राम सोने पळवून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून वितळलेल्या मुखवट्याचे एक किलो 351 ग्राम सोने लगडीच्या स्वरूपात हस्तगत केले होते. जिल्हा न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. हे सोने परत मिळावे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावरील सुनावणीअंती हे सोने पुन्हा राज्य सरकारला द्यावे, असे निर्देश मार्च अखेरीस न्यायालयाने दिले होते.

 उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुद्देमालापासून सुवर्ण गणेशाच्या आधीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला सुवर्ण गणेशाचा नव्याने मुखवटा तयार करण्याचे काम देण्यात आले. येत्या अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार  व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नवीन गणेश मुखवट्यांची गणेश मंदिरात पुनर्स्थापना केली जाणार आहे.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply