कामोठे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयात कामोठे, जुई, नौपाडा परिसरातील विविध स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील उपशिक्षक अनिल पाटील यांच्या संपर्कातून पनवेलमधील सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाला विविध शैक्षणिक साहित्य मदत मिळाली आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील प्राथमिक वर्गातील पहिली ते चौथीच्या 86 विद्यार्थांना स्कूल किट वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये स्कूल बॅग, वह्या, पाटी, पेन या साहित्याचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या वेळी सेवा सहयोग संस्थेचे अध्यक्ष सुधीर पटेल , चंद्रमोहन नायर, निर्मला नायर, डॉ. रेड्डी, प्रवीण कुमार, माधवी पाटील, जयश्री सानप, विद्यालयाचे चेअरमन स्वामी म्हात्रे, माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यालयातील एस.एस.सी. परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी श्रुती कापेई, जागृती पास्ते, ओमकार जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक चाळके एस.टी. यांनी विद्यार्थांना मोफत स्कूल कीट दिल्याबद्दल सेवा सहयोग संस्थेचे आभार मानले व विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल 100 टक्के लागल्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे कौतुक केले.