पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेशमंडळांना ऑनलाइन पद्धतीने परवानगी देणार आहे. याचे प्रात्यक्षिक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 8) घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले. या वेळी आयुक्तांनी नोंदणी फी कमी करण्याचे आश्वासनही दिले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापालिका अधिकारी, पोलीस विभाग, गणेशमंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेश मंडळांना ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. गणेशोत्सव मंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये वाहतुकीला व पादचार्यांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन मंडप उभारावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. यावर्षी 57 विसर्जन घाटावर पालिकेच्या वतीने विसर्जनासाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.
गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगीसाठी http://smartpmc.in/Login ही वेबसाईट तयार केली आहे. या अर्जासोबत धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणी प्रमाणपत्र, जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, स्थळदर्शक नकाशा स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने एक खिडकी योजनेंतर्गत अग्निशमन ना हरकत दाखला, वाहतूक ना हरकत दाखला व महानगरपालिकेची मंडप उभारण्याबाबतची परवानगी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी महापालिकेच्या 1800-227-701 या टोल फ्री क्रमांक, तसेच ई-मेल panvelcorporationgmail.com, दूरध्वनी क्रमांक 022-27458040/41/42, व्हॉट्सअॅप क्रमांक व एसएमएस. सुविधेसाठी 9769012012 हे क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे भराावेत. सिडको ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगत असल्याने महापालिकेने रस्ते लवकर दुरूस्त करावेत. वाहतूक पोलिसांवर यावेळी मोठा ताण येत असतो, यासाठी महासभेत ठराव मंजूर करण्यात आलेले ट्रॅफिक वार्डनची लवकरात लवकर नेमणूक करावी. -परेश ठाकूर, माजी सभागृह नेते