Breaking News

“पुस्तक आपला खरा मित्र”

मी वाचलो कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की, यातून मिळणारा आनंद एकमेकाद्वितीय असतो. वाचनाची सर बाकी कोणत्याही छंदाला नाही. पुस्तक हा आपला मित्र असतो. निरपेक्ष वृत्ती असणारे पुस्तक आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, आपल्याकडे काहीच मागत नाहीत. हातात पुस्तक आलं की आपण गर्दीतही एकांतात जातो आणि एकांतात असताना पुस्तक आपल्याला वेगवेगळ्या रंगीबेरंगी, दिलकश, अनोख्या मैफलींमध्ये घेऊन जातं. मला अत्यंत आवडणार्‍या तीन पुस्तकांबद्दल आता थोडक्यात सांगतो. यात इंग्रजी, हिंदी आणि मराठीतील प्रत्येकी एक पुस्तक आहे.

अ गॅलरी ऑफ रास्कल्स (इंग्रजी)-रस्किन बाँड
रस्किन बाँड हा एक अवलिया लेखक, मसुरीत राहणारा. त्याचं सर्व लेखन मसुरी, डेहराडून आणि आजुबाजूच्या परिसराच्या पार्श्वभूमीवरचं आहे. अत्यंत साधी सोपी आणि वाचकाला खिळवून ठेवणारी शैली यामुळे बाँड हा अत्यंत लोकप्रिय लेखक आहे. त्याचा नर्मविनोद आणि मिष्किलपणा यांच्यामुळे त्याच लेखन खुसखुशीत असतं. सडाफटिंग बॅचलर असणार्‍या या माणसाचं जगण्याबद्दलचं तत्वज्ञान आणि त्याची कलंदरीदेखील उल्लेखनीय अशीच आहे. मी आयएएस प्रशिक्षणासाठी मसुरीला एकूण तीन वेळा जाऊन आलो. पहिल्या खेपेस मला कळलं की, बाँड मसुरीतल्या एका पुस्तकाच्या दुकानात दर शनिवारी संध्याकाळी थोडा वेळ येतो व वाचकांना भेटतो. पहिल्या प्रशिक्षणात त्याच्या भेटीचा योग आला नाही पण दुसर्‍या प्रशिक्षणाच्या वेळी मी त्याला भेटू शकलो. वयोमानानं काहीशा थकलेल्या (पण गुबगुबीत) बाँडची भेट हा आयुष्यातला एक दुर्मीळ व आनंददायक प्रसंग.
’अ गॅलरी ऑफ रास्कल्स’ हे पुस्तक म्हणजे बाँडच्या भन्नाट लेखनशैलीचा उत्तम नमुना आहे. मसुरी, डेहराडून परिसरातले अनेक डांबरट (त्यांतले काही गुन्हेगार) ’नग’ आपल्याला त्याच्या कथांतून (किंवा कथावजा लेखांतून) भेटतात. ’सात खून माफ’ हा चित्रपट यातल्याच एका कथेवर (सुसामाज सेव्हन हजबंडस) बेतलेला आहे. टग्या आणि इरसाल लोकांचे अनेक हटके नमुने या कथांतून बघायला मिळतात. बाँडने त्यांना तिरकस चष्म्यातून फार बारकाईने टिपले असून आपल्या धमाल शैलीने यांतला एक एक प्रसंग त्यानं जिवंत, रससशीत आणि बहारदार केला आहे.
हे पुस्तक वाचकांना एका वेगळ्याच अफलातून दुनियेची भन्नाट सफर घडवून आणतं.

साये में धूप (हिंदी) -दुष्यंत कुमार
साये में धूप हा दुष्यंत कुमार यांचा 1975मध्ये प्रकाशित झालेला गजल संग्रह. हा उर्दू की हिंदी असा प्रश्न वाचकाला पडू नये म्हणून खुद दुष्यंत कुमारांनीच प्रस्तावनेत याबाबत लिहिलंय ’मै स्वीकार करता हूँ, की उर्दू और हिंदी अपने अपने सिंहासनसे उतरकर जब आम आदमी के पास आती हैं तो उनमें फर्क कर पाना बड़ा मुश्किल होता है. मेरी नीयत और कोशिश यह रही है की इन दोनो भाषाओंको ज्यादा से ज्यादा करीब ला सकूँ. इसलिये ये गजलें उस भाषा में कही गयी हैं, जिसे में बोलता हूँ. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की, उर्दू मिश्रित हिंदीतील गजला या संग्रहात आहेत. दुष्यंत कुमार यांचं वैशिष्टच हे आहे की, साध्या सोप्या शब्दांमध्ये मोठा आशय ते मांडत असत.
‘हो गई है पीर परबतसी पिचलनी चाहिए
इस हिमालयसे कोई गंगा निकलनी चाहिए’
हा त्यांचा अत्यंत लोकप्रिय शेर याचे उत्तम उदाहरण आहे.
‘मैं जिसे ओढता बिछाता हूँ
वो गजल आपको सुनाता हूँ’
हे त्यांचे शब्द त्यांची गजल आणि त्यांचं आयुष्य यांच्यातलं घट्ट नातं विषद करतात. दुष्यंत कुमार यांचे असे अनेक शेर कोटेबल आहेत. पण तो मोह टाळून मी इतकंच म्हणेन की, ते हिंदीतले सुरेश भट आहेत. कारण त्यांच्या गजलची जातकुळी भटांच्या गजलशी जवळचं नातं सांगणारी आहे. या निमित्ताने मी वाचकांना सुरेश भट यांची रुपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात आणि सप्तरंग ही कवितांची पुस्तकंही वाचण्याची आग्रही शिफारस करतो.

बोलगाणी (मराठी) -मंगेश पाडगांवकर
मंगेश पाडगांवकरांचे चाहते असंख्य आहेत. त्यांच्या कवितांची आणि कवितासंग्रहांची संख्याही मोठी आहे. जीवनाच्या अनेक रंगांचा वेध त्यांची कविता घेते. या प्रसंगी मी त्यांच्या ज्या काव्यसंग्रहाची आवर्जून शिफारस करत आहे त्याचं नाव आहे ’बोलगाणी’
‘बोलगाणी’ हा कवितेचा वेगळाच फॉर्म पाडगांवकरांनी या संग्रहात हाताळला आहे. बोलण्यासारखं गाणं म्हणजे बोलगाणं, या आधी असा फॉर्म कुणी मराठीत तरी हाताळलेला नाही. वेगवेगळ्या विषयांवरची एकूण साठ बोलगाणी या संग्रहात आहेत. पाडगांवकरांमधला अस्सल कवी आणि तत्वचिंतक या संग्रहामध्ये ओळी-ओळींत बघायला मिळतो.
भाषेच्या चर्‍हाटाला
कधीही अंत नसतो!
सारखी बडबड करणारा
चुकूनही संत नसतो

या मिष्किल बोलगाण्या बरोबरच कधी कधी
सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं,
हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला
न बोलता पाणी द्यावं!
असं अत्यंत आर्त, हळुवार तत्वचिंतनपर बोलगाणंही या संग्रहात आहे.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’
यासारखी पाडगावकरांची अत्यंत गाजलेली अनेक बोलगाणी या संग्रहात वाचायला मिळतात. पाडगांवकरांच्या चाहत्यांना तर ही बोलगाणी आवडतीलच, पण ज्यांनी पाडगांवकरांचं फारसं काही वाचलं नाही. त्यांनाही ही साधीसुधी प्रासादिक बोलगाणी भुरळ घालतील यात शंका नाही.
-डॉ. दिलीप पांढरपट्टे, आयएएस (विभागीय आयुक्त, अमरावती)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply