पनवेल : प्रतिनिधी
कोविड 19च्या रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पनवेल महापालिकेला यश आले आहे. मात्र, राज्यातील इतर भागात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे सर्व उपाय सक्तीने राबविण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) महापालिका अधिकार्यांच्या बैठकीत दिले. मास्क न वापरणार्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाईल, तर गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स)द्वारे बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता घरी विलगीकरण राहणार्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणार्या आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत. मास्कचा उपयोग न करणार्या नागरिकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणार्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्यात, यासह विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्तांनी केल्या आहेत.
आयुक्तांनी केलेल्या सूचना : लक्षणे आढळत नसलेल्या बाधित (असिम्प्टोमॅटिक) रुग्णांना घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) करण्यात येते. अशा रुग्णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारण्यात यावेत, तसेच त्यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवावी. बाधित व्यक्तींची योग्य माहिती ठेवून त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करावे. असिम्प्टोमॅटिक रुग्णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाइन) कालावधी पूर्ण होण्याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला कळवावी. अशा रुग्णांवर प्रभाग अधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्णांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन) करावे.
ज्या रहिवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्यात येतील.
खेळाच्या मैदानांवर व उद्यानांमध्येदेखील विना मास्क आढळणार्यांवर कारवाई करण्यात येईल. चाचण्यांची संख्या वाढवावी, टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या तीन टिवर भर दिला जावा.
फिरत्या दवाखान्यांच्या (मोबाइल व्हॅन) माध्यमातून रुग्ण शोध मोहीम सुरू ठेवावी. चाचण्या कराव्यात. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये हाय रिस्क कॉन्टॅक्ट व्यक्तींसाठी आणि लक्षणे नसलेल्या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र (नागरी आरोग्य केंद्र व फिरते पथक) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावे.
सर्व कोविड उपचार केंद्रांमधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्णशय्या, ऑक्सिजन रुग्णशय्या यांची पुरेशी उपलब्धता ठेवावी, असेही आयुक्तांनी नमूद केले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतून कोविड रुग्ण, रुग्णशय्या व इतर आवश्यक माहिती दर तासाने संकलित करून ती माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने अद्ययावत करावी.
लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्लब्ज, नाईट क्लब्ज, उपहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मिय स्थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्कचा वापर होत नसल्याचे आढळल्यास आणि 50 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तींना दंड करण्यासोबत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापनांवर, व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणार्या तसेच सार्वजनिक जागी थुंकणार्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांनी संख्या वाढवून विना मास्क फिरणार्यांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या होत असलेली कारवाईची संख्या वाढवावी.
लग्न सोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्या जागांवर तपासणी करावी. तिथे कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले असेल तर दंडात्मक कारवाई करून लग्नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्यवस्थापनांवरदेखील गुन्हे दाखल करावेत. विना मास्क फिरणार्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनाही अधिकार देण्यात आलेले असून पोलीसदेखील मार्शल म्हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करू शकतील.