नागोठणे : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवात गरबा नृत्य अथवा इतर प्रकार सादर करण्यासाठी अनेक आधुनिक वाद्यांचा वापर केला जातो, परंतु आजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये भोंडाई गीतांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जोपासली जात आहे. नाचणी, वरी, भात इत्यादींच्या कणसांनी सजवलेल्या कलशाला आदिवासी समाजात भोंडाई देवी असे म्हणतात. नवरात्रोत्सवाच्या काळात ही भोंडाई डोक्यावर घेऊन आदिवासी महिला गावागावात दाखल होतात, त्यांच्या हातात दोन टिपर्या आणि केसात रानफुले माळलेली असतात. या महिला भोंडाईची गाणी, नृत्य सादर करतात. लहान मुलींपासून वयस्कर स्त्रियासुद्धा त्यात सहभागी होतात. भाविकांकडून नाचणी, तांदूळ किंवा पैशांच्या स्वरूपात बिदागी मिळते. मिळालेल्या धान्यातून नवव्या दिवशी दुर्गामातेला नैवेद्य दिला जातो.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस आम्ही आमच्या परंपरेनुसार भोंडाई घेऊन गावागावात जात असतो. त्यातून मिळालेल्या बिदागी स्वरूपातील धान्यापासून आम्ही देवीला नैवेद्य दाखवतो
-नीरा नागेश लेंडी, आदिवासी महिला, नागोठणे