रोहे : महादेव सरसंबे
तालुक्यातील प्रसिध्द असलेले पडम गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेल्या मरूआई व जाखमाता नवरात्रौत्सवास सुरूवात झाली आहे. मरूआई, जाखमाता या दोन्ही माता रोहा तालुक्यात श्रध्दास्थान असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत आहेत. रोहा-अलिबाग मार्गावर अवचितगडाच्या पायथ्याशी असलेल्या पडम गावात मरूआई, जाखमाता या मातांचे मंदिर आहे. पडम हे संपुर्ण गाव कोळी समाजाचे असून गावावर येणारे संकटे या दोन माता दूर करतात, म्हणून ग्रामस्थांची या मातांवर अपार श्रध्दा आहे. त्याच बरोबर या दोन्ही माता मनोकामना पुर्ण करीत असल्याने भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात. काही वर्षापुर्वी ग्रामस्थानी जाखमाता मंदिराचे जिर्णोध्दार केले होते. तर मरूआईच्या मंदिरात थोडासा बदल केला आहे. जाखामाता मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. ग्रामस्थ मातेची मनपुर्वक सेवा करीत असतात. या वर्षी नवरात्रौत्सवानिमित्त दोन्ही मंदिर रंगरंगोटीसह विद्युत रोषनाईने सजले आहे. नवरात्रौत्सवात भाविक नवसपुर्ती करतात. गावातील महिला मातेची ओटी भरून विविध धार्मिक कार्यकम सादर करतात. संध्याकाळी दिपमाळेवरील दिप प्रज्वलीत करून दांडिया नृत्य करतात. या उत्सवात कोळी समाजाची पारंपरिक गीते व नृत्ये सादर केली जातात. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येणार्या भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने अल्पोपहार पुरविला जातो. ग्रामस्थ आळीपाळीने मंदिरात नऊ दिवस जागर करतात.