चौक : रामप्रहर वृत्त
विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. 2) उंबरखिंड विजयोत्सव दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभाताई देशमुख यांनी सरनौबतांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रचिती देशमुख, जिया देशमुख, सलोनी पाटील, जिज्ञा शिंदे व प्राची जाधव यांनी नेताजी पालकरांसंबंधी मनोगत व्यक्त केले. उज्ज्वला देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेचे सेक्रेटरी योगेन्द्र शहा, शाळेचे मुख्याध्यापक बादशा भोमले, पर्यवेक्षक दिलीप मोळीक, ज्योती देवळे, देवानंद कांबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. साधना माळी यांनी आभार मानले.
चौक : उंबरखिंड विजय दिनानिमित्त चौक येथील सिनियर ग्रुप आणि ग्रामस्थांनी बुधवारी (दि. 2) सरनौबत नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळापासून उंबरखिंड (चावणी) पर्यत मशाल मशाल रॅली काढली होती. खालापूर तालुक्यातील चौक हे सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव असून त्यांनी 2 फेब्रुवारी 1661 रोजी मोजक्या मावळ्यांसह कारतलबखान व महिला सरदार रायबाधन यांच्या फौजेवर उंबरखिंड (ता. खालापूर) येथे विजय मिळवला होता. हा गौरवशाली इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी उंबरखिंडीत विजय दिन साजरा केला जातो. तसेच नेताजी पालकर यांच्या चौक येथील जन्मस्थळापासून उंबरखिंडीपर्यंत मशाल रॅली काढण्यात येते. 361 व्या विजय दिनानिमित्त बुधवारी नेताजी पालकर यांच्या चौक येथील स्मारकाला अभिवादन करून मशाल रॅली काढण्यात आली होती. चौकमधील सरनौबत नेताजी पालकर विद्यालयाचे विद्यार्थी शिवकालीन वेशभूषा करून लेझीम ढोलताशाच्या गजरात रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी महिल व ग्रामस्थ उपस्थित होते.