बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने दिले चिन्ह
मुंबई ः प्रतिनिधी
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल-तलावर हे चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव व मशाल चिन्ह दिले होते, तर शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हे पाठविण्यास सांगितले होते. शिंदे यांच्याकडून मंगळवारी (दि. 11) ती पाठविल्यानंतर त्यातून ढाल तलवार चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत पक्ष व चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते, मात्र दोन्ही गटांकडून सादर झालेल्या नाव आणि चिन्हांमध्ये साधर्म्य असल्याचे समोर आले. त्यामुळे आयोगाकडून कोणता निर्णय घेतला जाईल याकडे लक्ष लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले, तर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली होती.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ढाल-तलवार, तळपता सूर्य व पिंपळाचे झाड असे पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी ढाल-तलवार चिन्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.