उरण ः प्रतिनिधी
उरण तालुक्यातील बोकडविरा येथील वायू विद्युत निर्मिती केंद्रात 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉयलरच्या झालेल्या भीषण स्फोटात सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगार 80 ते 85 टक्के भाजले होते. त्यातील विवेक धुमाळे यांचा जागीच मृत्य झाला. बोकडविरा येथील दुसरा कामगार विष्णू पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर डोंगरी येथील रहिवासी असलेला तिसरा कामगार कुंदन पाटील तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असताना मंगळवारी (दि. 11) त्यांची प्राणज्योत मालवली. वायू विद्युत केंद्राच्या दुर्घटनेत एका सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगारांना जीवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे हळहळ आणि संतापही व्यक्त होत आहे. कामगार विष्णू पाटील यांचा मृतदेह सोमवारी (दि. 10) रात्री वायू विद्युत निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वाजवळ आणण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी राज्य वीज निर्मिती गॅस टर्बाइनच्या याच प्रकल्पात रात्रीच्या वेळी अशाच प्रकारे बॉयलरचा स्फोट झाला होता व त्या वेळी येथील प्रचंड मोठी विद्युत मोटार 25 फुटांपेक्षाही लांब उडाली होती, तर 25 ऑक्टोबर 2008 रोजी शॉर्टसर्किटमुळे झालेल्या स्पार्किंगमुळे दुर्घटना घडली होती. यामध्ये तीन कर्मचारी होरपळले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. आता बॉयलर स्फोटात तीनही कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुरक्षाविषयक बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी होत आहे.