इंग्रजीत एक म्हण आहे हेल्थ इज वेल्थ. अर्थात आरोग्यम् धनसंपदा! शरीर सुदृढ व निरोगी असले की माणूस जोमाने कार्यरत राहून मनालाही प्रसन्नता मिळते. यासाठी नियमित व्यायाम, योगसाधना आवश्यक असते, जेणेकरून तंदुरुस्ती राखता येईल. हाच आरोग्याचा मूलमंत्र जपत यंदाही खारघर मॅरेथॉन मोठ्या उत्साहात रविवारी (दि. 22) होत आहे.
नववर्ष सुरू झाले की पनवेलसह रायगड आणि नवी मुंबईकरांना वेध लागतात ते खारघर मॅरेथॉनचे. आल्हाददायक वातावरणात होणारी ही स्पर्धा तितक्याच नेटक्या व दर्जेदार पद्घतीने आयोजिली जाते. त्यामुळे या स्पर्धेला दरवर्षी वाढता प्रतिसाद लाभत असल्याचे पहावयास मिळते. सुरुवातीला पनवेलपुरती मर्यादित स्वरूपात असलेली ही स्पर्धा आता राज्यस्तरावर डंका गाजवत आहे.
समाज प्रबोधनात्मक संदेश हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. यापूर्वी ‘रन अगेंस्ट एड्स’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी धावा’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फॉर निर्भय भारत’, सद्भावना दौड’, ‘एक धाव पाणी बचतीसाठी’, ‘स्त्री-भ्रूणहत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’, ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन’, ‘हम फिट तो इंडिया फिट’ अशी घोषवाक्य घेऊन स्पर्धा यशस्वी झाल्या आहेत. यंदा ’एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ अशा शीर्षकाखाली स्पर्धा होत आहे.
कोणत्याही देशाचे भविष्य आणि प्रगती तेथील तरुणाईवर अवलंबून असते. त्यासाठी युवा पिढीने योग्य मार्गाने जाणे गरजेचे आहे, पण आजकाल तरुण-तरुणी आणि प्रौढ लोक व्यसनांच्या आहारी जात आहेत. नशाबाजीला नवी पिढी फॅशन समजते. विशेषतः पार्ट्यांमध्ये दारू, सिगारेट, अमली पदार्थांचा पूर येतो. मग याची सवय होऊन ही मंडळी कधी व्यसनाच्या विळख्यात अडकतात हे त्यांनाही समजत नाही. याचे विपरित परिणाम स्वतःसह त्यांच्या कुटुंबावर होत असतात. हे सर्व जीवावरदेखील बेतू शकते. ते लक्षात घेता व्यसनमुक्ती काळाची गरज आहे आणि हेच खारघर मॅरेथॉनमधून अधोरेखित करण्यात येत आहे.
मॅरेथॉनच्या निमित्ताने खारघर नगरीत जबरदस्त माहौल आहे. तेथे आठवडाभर आधीच इतर विविध स्पर्धा झाल्या, तर प्री-इव्हेंटच्या अनुषंगाने शनिवारी सायकलिंग स्पर्धा उत्साहात झाली. कोरोनामुळे दोन वर्षे मॅरेथॉनमध्ये खंड पडला होता. ती कसर यंदा भरून निघत स्पर्धा नवा विक्रम रचेल असे चित्र दिसते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार्या खारघर मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत.
-समाधान पाटील, पनवेल (9004175065)
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …