Breaking News

आयपीएलने भारतीय संघाला काय दिले?

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) नुकतीच संपली.  येत्या काही दिवसात इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेपूर्वी आपल्या खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांचा सराव मिळावा यासाठी इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्टइंडिज यांसारखे देश एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळत आहेत. भारतीय खेळाडू मात्र आयपीएलमध्ये ट्वेंटी-20 सामने खेळत होते. विश्वकरंडक स्पर्धेसाठी ज्या 15 खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे ते सर्व खेळाडू आयपीएल खेळत होते. ट्वेंटी-20 सामने खेळल्यानंतर एकदिवसीय सामन्यांसाठी तयार होणे आणि कमी दिवसांमध्ये इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेणे ही विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना भारतीय संघातील खेळाडूंसमोर आव्हान असेल.

एकदिवसीय सामन्याचे तंत्र आणि ट्वेंटी-20 सामन्यांचे तंत्र यात फरक आहे. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यापूर्वी खेळाडूंना एकदिवसीय सामन्याचा सराव मिळायला हवा होता. आयपीएलऐवजी भारतीय खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायला मिळाली असती तर खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढला असता. त्याचा भारतीय संघाला फायदा झाला असता. आता एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघातील खेळाडूंना तयारी करावी लागेल.

ठिक आहे जे झालं ते झालं. आता आपण आयपीएलमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर नजर टाकू.  लोकश राहूलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 14 सामन्यांमध्ये 593 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याचा शोध सध्या भारतीय संघ घेत आहे. राहूल फॉर्मात आल्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत त्याचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विचार केला जाऊ शकतो. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 402 धावा केल्या त्याचबरोबर 14 गडी देखील बाद केले. राहूल आणि हार्दिक पांड्या हे दोन खेळाडू फॉर्मात आले. कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी यांनीदेखील या स्पर्धेत चांगल्या धावा जमवल्या. सलामीवीर रोहित शर्मा या स्पर्धेत जास्त धावा करू शकला नाही तरी त्याने 15 सामन्यांमध्ये 405 धावा केल्या आहेत. शिखर धवनने 521 धावा केल्या आहेत. जे प्रमुख फलंदाज आहेत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. अपवाद केदार जाधवचा. तो 12 सामन्यांमध्ये केवळ 162 धावा करू शकला. दुखापतीतमुळे त्याला काही सामने गमवावे लागले आहेत. विश्वकरंडक

स्पर्धेत दुसरा यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आलेला दिनेश कार्तिक व अष्टपैलू म्हणून ज्याने संघात स्थान मिळवले तो विजय शंकर हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये अयशस्वी ठरले आहेत. ॠषभ पंतची भारतीय संघात निवड होईल, असे वाटत असताना कार्तिकची संघात निवड करण्यात आली. एकीकडे पंत एकहाती सामने जिंकून देत होता तर कार्तिक मात्र अपयशी ठरला. विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झालेला विजय शंकर हा आयपीएलमध्ये अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंवर दबाव असतो. गोलंदाजीत चायनामन कुलदीप यादवने पार निराशा केली आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहल व डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा यांनी त्यामानाने चांगली कामगिरी केली आहे. चहलने 18 तर जडेजाने 15 गडी बाद केले. जसप्रित बुमराह व मोहमद शमी यांनी या स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी केली. भूवनेश्वरकुमार प्रभाव पाडू शकला नाही. अर्थात आयपीएलमधील कामगिरी पाहून आंतरराष्ट्रीय स्पर्धेेसाठी देशाच्या संघात निवड केली जात नाही असे असले तरी विश्वकरंडकसारख्या महत्वाच्या

स्पर्धेपूर्वी ही स्पर्धा झाल्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा विचार करावा लागतो. एकूणच आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी संमिश्र झाली आहे. जे खेळाडू फॉर्मात आहेत त्यांना आपला फॉर्म कायम राखावा लागणार आहे. जे खेळाडू आयपीएलमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत त्यांच्यासमोर चांगली कामगिरी करण्याचे एक आव्हान असेल.

रोहित शर्मा कर्णधारपदाचा दावेदार

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. या चारही वेळा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. आपण एक चांगला कर्णधार आहोत हे रोहित शर्माने सिद्ध केले आहे. 2019च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ज्या पद्धतीने डोकं शांत ठेवून परिस्थिती हाताळली ती वाखाणण्याजोगी होती.वास्तविक मलिंगाच्या आधीच्या तीन षटकांमध्ये 40 पेक्षा जास्त धावा निघाल्या होत्या. असे असताना रोहितने शेवटचे षटक टाकण्यासाठी मलिंगाच्या हाती चेंडू दिला. मलिंगा एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याने अशा परिस्थितीत अनेकवेळा गोलंदाजी केली आहे. त्यामुळे अनुभवी मलिंगाची त्याने निवड केली. त्याचा हा निर्णय किती योग्य होता हे मलिंगाने शेवटच्या षटकात विजय मिळवून देऊन सिद्ध केले. रोहित शर्मा आताच्या घडीला भारतातील एक कुशल कर्णधार आहे. भविष्यातील भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा तो दवेदार आहे. या आयपीएलने भारताला भविष्यातील एक कर्णधाराचा पर्याय दिला आहे.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply