Breaking News

नारायण राणे यांचा भाजपप्रवेश महाराष्ट्राच्या हिताचाच!

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांपासून तर राजकीय विश्लेषक अशा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही व्यक्तीच अशा असतात की जे बोलले तरी बातमी होते आणि नाही बोलले तरी बातमी होते. माध्यमांना अशा व्यक्तींची दखल घ्यावीच लागते. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच नारायण राणे हेही यापैकीच एक नेते. नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची बातमी आली.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ’वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतल्याचे वृत्त आले आणि सर्वत्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. आता नारायण राणे यासंदर्भात काय निर्णय घेतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, परंतु एक मात्र निश्चित की नारायण राणे यांनी जर आपला पक्ष विलीन केला किंवा त्यांनी स्वतः भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला तरी त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात दूरगामी परिणाम होतील. खरं पाहता नारायण राणे यांनी  भाजपमध्ये प्रवेश करणे एक औपचारिकताच म्हणावी लागेल. कारण भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर नारायणराव हे यापूर्वीच राज्यसभेवर निवडून गेले आहेत आणि आजमितीस ते राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांमध्ये पुढच्या बाकावर बसतात. महाराष्ट्राच्या राजकारणात जर स्थैर्य आणि पर्यायाने विकासाभिमुख राजकारण करून राज्याला आणि त्या माध्यमातून देशाला ’अच्छे दिन’ आणायचे असतील, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आज शिवसेनेने विकासाभिमुख राजकारणावर भर दिला असून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भविष्यात डावे-उजवेऐवजी विकासाभिमुख राजकारण होण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांना शेतकरी, कामगार, पीडित, शोषित, महिला अशा समाजातील सर्व घटकांचे भले व्हावे असे वाटते आणि तीच भूमिका देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची असल्यामुळे ’झाले गेले गंगेला मिळाले’ ही उदात्त भूमिका घेऊन महाराष्ट्रात राजकारण करायला हवे. नारायण तातू राणे हे महाराष्ट्रातील झंझावाती व्यक्तिमत्त्व आहेत. मालवणच्या मुशीतला आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला अस्सल कोकणी माणूस शिवसेनेच्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी झपाटला आणि हा हा म्हणता शाखाप्रमुख, नगरसेवक, मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन म्हणजेच बेस्ट समितीचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशा विविध प्रकारच्या भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला. त्यांची कर्तव्यतत्परता, कर्तबगारी, कर्तृत्व, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता मी स्वतः जवळून पाहिली आहे. अर्थात अँग्री यंग मॅनसारख्या या नेत्याला थांबणे हे रक्तातच नसल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत आदर, प्रेम, श्रद्धा, विश्वास असूनही 2005 साली काँग्रेस पक्षात प्रवेश घ्यावा असे वाटले. 1991 साली जबरदस्त नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला ’जय महाराष्ट्र’ केल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी भुजबळ यांना सळो की पळो करून सोडले होते, परंतु नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तशी परिस्थिती राहिली नव्हती. शिवसेना आणि राणे समर्थक एकमेकांसमोर बाह्या सरसावून उभे ठाकले होते. विधानसभेच्या मालवणच्या पोटनिवडणुकीत दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रचंड सभा घेऊनही, मुंबईतील शिवसैनिकांची फौज तिथे नेऊनही परशुराम उपरकर यांना दणदणीत मतांनी पराभूत व्हावे लागले होते. नारायण राणे यांच्यावर बाळासाहेबांनी पुत्रवत प्रेम केले होते म्हणूनच त्यांना राणेंच्या पक्षत्यागामुळे वेदना झाल्या होत्या. राणेंनाही काही आनंद झाला नव्हता. छगन भुजबळ यांनासुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली की आजही भरून येते. ते भरभरून बोलतात. नारायण राणेसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी काढल्या की भरभरून बोलतात.

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातचे जेवण अजूनही भुजबळ-राणे यांना मातोश्रीवर येण्यासाठी खुणावत असते. सुरेशदादा जैन यांनी नारायण राणे यांना दादा, तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देऊन तुमचा सन्मान केला आहे. दादा, शिवसेनेवर टीका करू नका, असे बोलून दाखविले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंत्रालयात एक शोकसभा आयोजित केली होती. तेव्हा भुजबळ आणि राणे या दोघांनी आपापल्या आठवणींना उजाळा दिला होता. विधिमंडळातसुद्धा या दोघांची भाषणे सर्वांची मने हेलावून सोडणारी होती. राणे जरी काँग्रेस पक्षात गेले तरी काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळे नारायण राणे या कार्यपद्धतीमध्ये स्वतःला बांधून ठेवू शकणे शक्यच नव्हते.  त्यांच्या दृष्टीने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. स्वाभिमान संघटनेचे अस्तित्व फार फार तर राणे यांनी वेगळे ठेवावे. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक ही दिग्गज नेतेमंडळी जर शिवसेनेत आली तर आपले महत्त्व राहणार नाही, अशा मतांचे काही जण असल्याची चर्चा ऐकायला मिळते. खरं खोटं तेच जाणोत, पण आजमितीला नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने राजकारण करणे आणि तेही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे ही गरज आहे. कुणी कितीही म्हटले तरी आज शिवसेनेचे महाराष्ट्रात मजबूत स्थान आहे. भारतीय जनता पक्ष हा 2014 नंतर देशाबरोबर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन वाटचाल करणे सर्व संबंधितांच्या आणि पर्यायाने राज्याच्या हिताचे आहे. हेच ध्यानी घेऊन महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ हे सूत्र स्वीकारून सहकार्य, सौहार्द, समन्वय, सामंजस्य या चतुःसूत्रीने राजकारण केले तर तेच महाराष्ट्राच्या हिताचे ठरेल. देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोघांना बरोबर घेऊन वाटचाल करू शकतात आणि उद्धव ठाकरे व शिवसेनेने मनाचा मोठेपणा दाखवून, झाले गेले विसरून पुढे वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. छगन भुजबळ यांनी राज्याचे गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली.

भोईवाडा न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली. त्याच छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन प्रकरणात जामिनावर मुक्तता होताच शिवसेनेकडून त्यांच्याबद्दल जी सकारात्मक भूमिका स्वीकारण्यात आली ते पाहता मातोश्री छगनरावांबद्दल बरीच मवाळ झाली असल्याची चर्चा आहे. त्यातच छगनरावांच्या पाठिंब्यावर नरेंद्र भिकाजी दराडे आणि किशोर भिकाजी दराडे हे दोन भाऊ शिवसेनेचे आमदार म्हणून विधान परिषदेत निवडून आले. हे सर्व पाहता नारायण राणे यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी ’गिले शिकवे’ सोडून एकमेकांना सहकार्याचा हात देत देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत विकासाभिमुख राजकारण करावे. डोक्यावरून बरेच पाणी गेले आहे. एकमेकांबद्दल सूडाची भावना मनात ठेवण्याऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ’ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’ या सूत्राची उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोघांना चांगलीच जाण असल्याने महाराष्ट्रात आगामी राजकारण करणे देवेंद्र, उद्धव, नारायण या त्रिमूर्तीला सहज शक्य होईल आणि त्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून ’वंचित’ ठेवणे, दूर ठेवणे चांगले जमू शकेल. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांची नारायण राणे यांच्याबद्दल ’माझे पूर्वीचे सहकारी नारायण राणे’ ही तसेच नारायण राणे यांनी ’माननीय उद्धव ठाकरे’ असे काढलेले उद्गार यांच्या चित्रफिती पुढे आल्याचे पाहता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे ही त्रिमूर्ती एकत्र येऊ शकतात आणि तसे घडले तर महाराष्ट्रात निकोप, सौहार्दाचे राजकारण घडू शकेल आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास घडू शकेल हे निश्चित. म्हणूनच नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा महाराष्ट्राच्या हिताचाच म्हणावा लागेल. यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि नारायण राणे व त्यांचे समर्थक यांना आपापल्यापुरती आचारसंहिता आखून घ्यावी लागेल. एकमेकांना शिव्याशाप देण्याऐवजी तंगड्यात तंगड्या न घालता हातात हात घालून समन्वय, सामंजस्य, सौहार्द आणि सहकार्य या माध्यमातून काम करावे लागेल. असे केले तर पुढची अनेक वर्षे तुमच्या राजसिंहासनाला धोका निर्माण होऊच शकणार नाही. शांत डोक्याने विचार करा. वाचाळवीरांना दूर ठेवा किंवा त्यांना योग्य ती समज द्या. सकारात्मक भूमिका घ्या. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत ’उचला तो बेलभंडार आणि लागा कामाला, हा शिवरायांचा महाराष्ट्र यशोशिखरावर नेण्यासाठी हाती वरमाला घेऊन तुमची प्रतीक्षा करतोय!’ जय महाराष्ट्र!!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply