मुंबई ः प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले काही दिवस महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयीची चर्चा सुरू आहे. विश्वचषकानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. निवड समितीनेही आगामी मालिकांमध्ये ऋषभ पंत पहिली पसंती असेल, असे म्हणत धोनीला सूचक इशारा दिला, मात्र धोनीसारख्या खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेसा निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा, असे मत प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी व्यक्त केले. ते पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
हर्षा भोगले यांनी गेल्या काही दिवसांत धोनीच्या फलंदाजीतील खालावलेल्या फॉर्मबद्दलही भाष्य केले. काही वर्षांपूर्वी धोनी जसा खेळ करीत होता तो धोनी आज आपल्याला मिळणे अशक्य आहे. खेळात काही वर्षांनंतर शारीरिक बंधने येतात. प्रत्येकाला आक्रमक खेळ करण्याची इच्छा असते, मात्र शरीर साथ देत नाही. धोनीच्याही बाबतीत हेच घडत असल्याचे भोगले म्हणाले.