पॅसेंजर गाडीचे तिकीट पूर्ववत करावे; रोहेकरांची मागणी
रोहे : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून रोहा तालुक्याची ओळख. या ठिकाणी जलद रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी रोेहेकरांतून होत आहे. रेल्वे येणार तालुक्यासह परिसराचा विकास होणार म्हणून नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या. परंतु रोहेकरांना अद्याप हव्या अशा सुविधा मिळत नाहीत.रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून रोहा तालुक्याची ओळख. या तालुक्यातुनच पुणे, रोहा, माणगाव, ताम्हाणे मार्गे मुरुड, खोपोली मार्गे पुणे राज्यमार्ग आहे. दुसरीकडे तळ कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्ग हे रस्त्याचे जाळे तालुक्यात पसरलेले आहे. या रस्त्यांना पूरक म्हणून रेल्वे महामार्ग झाला असून या सर्व जवळून एकमेकांच्या पूरक असताना यातून या परिसराचा विकास होणार आहे त्यामुळे रेल्वे आल्याने रोहेकरांना निश्चितच फायदा देऊन जाईल असे बोलले जात होते. आज रेल्वे आली आहे. या मार्गातून जाणार्या अनेक गाड्या सुसाट सुटतात.अनेक प्रवाशांना याचा फायदा होतो. परंतु यातील बहुतांशी जलद गाड्यांना रोह्यात थांबा नसल्याने रोहेकरांना याचा फायदा होत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेले व जिथून कोकण रेल्वे सुरू होते त्या रोहा रेल्वे स्थानकावर जिल्ह्यात गाड्यांना थांबा मिळावा अशी रोहेकरांची मागणी आहे. रोहा तालुक्यात धाटाव औद्योगिक क्षेत्र, नागोठणे औद्योगिक क्षेत्र, लगत असलेला तळा, मुरुड, अलिबाग,पाली आदी पर्यटन क्षेत्र असल्याने सातत्याने रोहेकडे वर्दळ असते. देशातील अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात या औद्योगिक क्षेत्रात नोकरी निमित्ताने नागरिक आलेले आहे.तर सरकारी नोकरी निमित्ताने अनेक नागरिक अन्य जिल्ह्यातून, राज्यातून आलेले आहेत.यासह रोहेकरांना नोकरीसाठी मुंबई,ठाणे,नवी मुंबई याह तळ कोकणात नोकरीसाठी जात असतात. पर्यटनासाठी रोहेकरांना बाहेर जावे लागते.या सर्व बाबींचा विचार केल्यास रोहेकरांना मध्य रेल्वे व कोकण रेल्वेच्या ज्या गाड्या धावतात त्या गाड्यांचा या सर्वांना फायदा होऊ शकतो.परंतु यातील बहुतेक गाड्यांना रोहा येथे थांबा नसल्याने या नागरिकांना आपल्या इच्छित अशा ठिकाणी जाण्यासाठी पनवेल मुंबई गाठावे लागत आहे.या सर्व प्रवाशांना सुविधा मिळावा असल्यास त्यांना रोहा रेल्वे स्थानकातून जाणे सोयीचे ठरेल परंतु या सर्वांना इच्छित प्रवास करण्यासाठी रोहा रेल्वे स्थानकात जलद गाडयांना थांबा आवश्यक आहे. सध्या जात असलेल्या काही गाड्यांना रोहा रेल्वे स्थानकात टेक्निकल थांबा आहे.परंतु प्रवासी थांबा नसल्याने ज्या गाड्यांना टेक्निकल थांबा आहे. त्या गाड्यांना प्रवासी थांबा देणे आवश्यक आहे. दुसरीकडे दिवा सावंतवाडी व दिवा रत्नागिरी या गाड्या निडी येथे थांबत नसल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे नोकरी निमित्ताने रोज जाणार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना रोहा येथे स्थानकात येण्यासाठी जवळजवळ तीन किलोमीटर अंतर रोज सकाळी विविध वाहनाने गाडी मिळवण्यासाठी कापावे लागत आहे. तर दुसरीकडे मेढा, भातसई, शेणवई, सानेगाव, यशवंतखार, परिसरातील गावांना रोहा र ेल्वे स्थानकात येण्यासाठी जास्त अंतर कापावे लागत आहे. या गाड्या निडी येथे थांबणे आवश्यक आहे. या गाड्या परतीच्या प्रवासाठी आधी पॅसेंजर गाड्या होत्या. परंतु या गाड्यांना जलद गाड्यांचे तिकीट मिळत असल्याने या गाड्यांसाठी तिकीट कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे रोहा दिवा या पॅसेंजर गाडीला अद्यापही जलद गाडीचे तिकीट मिळत आहे. पॅसेंजरने प्रवास करत असताना तिकीट जलद गाड्यांचे असल्याने नागरिकांना विनाकारण भुर्दंड सोसावे लागत आहेत. अन्य ठिकाणी कोरोना नंतर पॅसेंजर गाड्यांना लावण्यात आलेल्या जलद गाड्यांचे तिकीट कमी करून पुन्हा पॅसेंजर गाडीचे तिकीट लावण्यात आले आहे.परंतु रोहा दिवा यागाडीलि मात्र जलद गाडीचे तिकीट कायम आहे.महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रोहा रायगड सातत्याने रेल्वे कडे विविध मागण्यासाठी पाठपुरावा केला आहे.या पाठपुरावांच्या माध्यमातून रेल्वेकडुन रोह्यातून एक नवी गाडी चालू करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकात तिकीट साठी मशीन ही बसवण्यात आले आहे.अन्य मागण्यासाठी सातत्याने रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा चालू आहे.रोहेकरांच्या जलद गाड्या बाबत व पॅसेंजर तिकीट बाबत ज्या मागण्या आहेत त्या रेल्वेने मान्य केल्यास रोहेकरांसाठी फायदेशीर ठरतील.
रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी सातत्याने आम्ही रेल्वे बोर्डाकडे मागणी करत असताना काही मागण्यांचे सकारात्मक रेल्वेकडून विचार केल्याने त्याचा फायदा रोहेकरांना झाला आहे. परंतु आमची सातत्याने मागणी असलेल्या जलद गाड्यांना अद्याप रोहा रेल्वे स्थानकात थांबा मिळाला नाही. यासह पॅसेंजर गाडीचे तिकीट दर कमी करावे ही आमची प्रमुख मागणी आहे. दिवा सावंतवाडी दिवा रत्नागिरी या गाड्यांच्या परतीसाह निडी येथे थांबा मिळावा. काही जलद गाड्यांना टेक्निकल थांबा आहे. त्या गाड्यांना रोहा रेल्वे स्थानकात प्रवासी थांबा मिळावा ही प्रमुख मागणी आमची आहे. यासाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्यावतीने रोहेकर नागरीकांना घेवून पदाधिकारी, माझे सर्व सहकारी सातत्याने रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करत आहेत.
-सूर्यकांत वाघमारे, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रोहा रायगड