राष्ट्रवादीच्या 52 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय
नवी मुंबई : प्रतिनिधी
महत्त्वाच्या नेत्यांचे होणारे पक्षांतर डोकेदुखी ठरले असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या 52 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि. 29) झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला असून, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना हा निर्णय कळविण्यात येणार आहे. त्यानंतर नाईक कुटुंबीय भाजप प्रवेशाची औपचारिक घोषणा करतील, अशी चर्चा सुरू आहे.
नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सोमवारी दुपारी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि कुटुंबीय अंतिम निर्णय घेणार आहेत.
गणेश नाईक यांचे अनेक वर्षे नवी मुंबईवर वर्चस्व राहिले आहे, मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबई महापालिका प्रभागांनुसार झालेले मतदान पाहिले असता प्रत्येक प्रभागात युतीच्या उमेदवाराने आघाडी मिळविली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश नाईक यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे 40 हजार मतांनी पिछाडीवर होते, तर ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही परांजपे 45 हजार मतांनी मागे राहिले. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला नवी मुंबईत धोका निर्माण झाला असून, पुढील महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो, असे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मत आहे. हे टाळण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणे हा सत्ता राखण्याचा उत्तम मार्ग असल्याचे या सर्व नगरसेवकांचे म्हणणे असल्याचे समजते.
शिवेंद्रराजे यांच्याही भाजपप्रवेशाची शक्यता
सातारा : शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करून पक्षांतर करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तुम्ही म्हणाल तसे, असे एका वाक्यात सर्वांनीच सांगून शिवेंद्रराजेंच्या भूमिकेसोबत राहण्याचे ठरविल्याने आता त्यांच्या भाजप प्रवेशाची केवळ घोषणाच शिल्लक राहिल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. 29) झालेल्या बैठकीला पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अॅड. दिलावर मुल्ला, नीळकंठ पालेकर, प्रकाश गवळी, व्यंकटराव मोरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
आमदार कोळंबकर यांचा राजीनामा
मुंबई : काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बुधवारी (दि. 31) ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोळंबकर यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक, आमदार वैभव पिचड आणि चित्रा वाघ यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. कोळंबकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. वेळोवेळी त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यताही केली होती. सोमवारी (दि. 29) त्यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्व व आमदारकीचाही राजीनामा दिला.