Breaking News

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला शासनाचा नेहमीच पाठिंबा -राज्यपाल

खारघर : रामप्रहर वृत्त

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला शासनाचा नेहमीच पाठिंबा असतो, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. 7) खारघर येथे केले.  नवी मुंबई खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्किल्सचा पाचवा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी ते बोलत होते.

श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन साई पदव्युत्तर संस्था रोहतकच्या कुलगुरू अनिता सक्सेना, प्र-कुलगुरू कृष्णा डॉ.विद्यापीठ, कराडचे डॉ. प्रवीण शिनगारे, कोंकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, भारतात जन्मजात हृदयविकाराने जन्मलेल्या मुलांची अंदाजे संख्या दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रोगाचे निदान आणि उपचार यावर लक्ष केंद्रित करून प्रतिबंध हे आमचे प्राथमिक ध्येय असले पाहिजे. गर्भवती मातांनी गर्भधारणे दरम्यान निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये रोगाचे निदान शोधून त्यावर उपचार करण्याच्या सुविधाही वाढवायला हव्यात. या रुग्णालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तज्ञ आणि प्रगत उपकरणे पुरवली जावीत. असे केल्याने, आम्ही मोठ्या रुग्णालयांवरील भार लक्षणीयरीत्या कमी करू आणि वेळेवर हस्तक्षेप करण्यास सक्षम होऊ, ज्यामुळे मौल्यवान जीव वाचू शकू. श्री सत्य साई संजीवनी रिसर्च फाउंडेशन जन्मजात हृदयविकारावर संशोधन करत असल्याचे पाहून आनंद व्यक्त करत संस्थेशी संबंधित शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल अभिनंदन करुन यावेळी राज्यपाल महोदयांनी  शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या बाल रुग्णांना गिफ्ट ऑफ लॉईफ प्रमाणपत्र   राज्यपालांच्या हस्ते  देण्यात आले. या वेळी श्री सत्य साई संजीवनी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन यांची समोयोचित भाषणे झाली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply