Breaking News

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी अभिजीत विवेकानंद पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल

पनवेल : प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्यात बँकचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे पुत्र व बँक संचालक अभिजीत पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा वडके यांच्या जामीन अर्जावरील पनवेलच्या जिल्हा न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतचा निकाल शुक्रवारी (दि. 9) देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी सांगितले. त्यामुळे आता विवेक पाटील यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगाही तुरूंगात जाण्याची शक्यता आहे.
कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळाने व बोगस कर्जदारांनी गैरव्यवहार करून 633 कोटींपैकी 512 कोटी 54 लाख 53 हजार रुपयांचा अपहार करून बँकेची स्थिती डबघाईला आणली. हा प्रकार उजेडात आल्यानंतर फेब्रुवारी 20मध्ये विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण 76 जणांवर फसवणुकीसह अफरातफर, बनावटगिरी त्याचप्रमाणे सहकारी संस्था अधिनियम कलम 147सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये यासाठी अभिजीत विवेकानंद पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयीन  कोठडीत असलेल्या अपर्णा वडके यांनीही पनवेलच्या जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता. याबाबतची सुनावणी सोमवारपासून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांच्यासमोर सुरू होती. अभिजीत पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. राहुल ठाकूर व अपर्णा वडके यांच्यातर्फे अ‍ॅड. पी. एम. ठाकूर यांनी युक्तिवाद केला, तर सरकारतर्फे अ‍ॅड. वाय. एस. भोपी यांनी युक्तिवाद केला. या वेळी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता शुक्रवारी न्यायालय काय निकाल देणार याकडे ठेवीदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply