पेण ः प्रतिनिधी
रामभाऊ म्हाळगी यांनी कार्यकर्त्यासाठी सांगितलेली तत्वे म्हणजे त्याच्या पायात भिंगरी असली पाहिजे, तोंडात साखर असली पाहिजे आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे. या तीन गोष्टी तंतोतंत धैर्यशील पाटील यांच्यात असून यामुळेच देशाचे नेते अमित शाह, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत बावनकुळे यांनी धैर्यशील पाटील यांची खासदार म्हणून निवड केली असून त्यांचा हा विश्वास ते सार्थ ठरवतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 2) पेण येथे व्यक्त केला.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेचे खासदार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पेणमधील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन पेणमध्ये करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विनायक नातू, सुरेश लाड, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील, गिरीश तुळपुळे माजी जि.प. अध्यक्ष नीलिमा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डाव्या विचारसरणीतून उजव्या विचारसरणीत येणे सोपे नाही, परंतु भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून जी मंडळी पक्षात आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन न देणे ही जबाबदारी आमची आहे, असे सांगून माजी आमदार सुरेश लाड आप भी कतार मे है, असे सूचक वक्तव्य मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी केले.
आपले मनोगत व्यक्त करताना खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की, भाजपने ज्या पद्धतीने आम्हाला सामावून घेतले व मोठी जबाबदारी दिली यासागठी पक्षातील ज्येष्ठ नेते व सहकार्यांचे आभार मानतो. विशेषकरून माझ्यासोबत ज्या कार्यकर्त्यांनी सर्वस्व सोडून आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली असे कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत हे माझे भाग्य आहे. आगामी काळात रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मोठे यश प्राप्त करून पक्षाला आपल्या कामाची पोचपावती द्यायची आहे.
आमचे जुने नेते ठिकठिकाणी माझी खासदारकी 17 महिन्यांची असल्याची अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत, मात्र ती 17 महिने नसून दोन वर्ष असणार आहे आणि या दोन वर्षात असे काम करून दाखवेन की, जयंत पाटील यांनाही आश्चर्य वाटेल. ज्या शेकापने जिल्हा परिषदेत स्वतःच्या 24 जागा निवडून आणूनदेखील 12 जागा निवडून आलेल्या राष्ट्रवादी पक्षाला जिल्हा परिषदचे अध्यक्षपद दिले हे सामान्य कार्यकर्त्याला न सुटणारे गणित आहे. यापुढे टीकेला प्रतिउत्तर दिले जाईल, असा इशाराही खासदार धैर्यशील पाटील यांनी जयंत पाटील यांना दिला.
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार रविशेठ पाटील यांनीही विचार व्यक्त केले. या वेळी कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्री रवींद्र चव्हाण आणि नवनिर्वाचित खासदार धैर्यशील यांचा गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …