‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार
सातारा : रामप्रहर वृत्त
पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा आपल्या दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संस्थेच्या हनुमान विद्यालयाच्या नुतनीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी काढले. या इमारतीसाठी 75 लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी त्यांनी विद्यालयाच्या विकासासाठी आणखी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील निढळ येथे रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयाची नुतनीकृत इमारत रायगडचे माजी खासदार आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 लाख रुपयांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच वर्गखोल्या, विविध कक्ष, ऑफिस यांचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) झाले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीप्रमाणे मुक्तहस्ते मदत केली. ते सातारला रयत शिक्षण संस्थेचे चार वर्षे विद्यार्थी होते. कर्मवीर अण्णांचा कमवा आणि शिका हा कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी एक वर्ष काम केले. चार वर्षे या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केले आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. वर्ष, दोन वर्षे इथे काम केल्यानंतर त्यांच्या भागामध्ये नवी मुंबईत ते गेले. तिथे काम करायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये पडले आणि या क्षेत्रात कष्ट करून सगळ्यांना बरोबर घेऊन प्रचंड यशस्वी झाले. त्या यशाचाच परिणाम संस्थेचे कोणतेही नवीन काम असले आणि ते हजर असले तर मला खात्री असते की आता या कामाला जो काही अडथळा किंवा कमतरता आहे त्यातून मार्ग निघेल. आजपर्यंत मला आकडा लक्षात नाही. मागे एकदा मी माहिती घेतली होती की, संस्थेला त्यांच्याकडून सहाय्य किती झाले असेल? जो आकडा एक वर्षापूर्वीचा माझ्याकडे होता तो शंभर कोटींचा होता. माझ्या मते या राज्यात कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणगीदार असतात. तरीपण त्यांच्यात सातत्य नसते. वर्षानुवर्ष मदत करत असतात, देणगीदार असतात, मात्र स्वतःच्या शाळेपुरते हे दातृत्व ते दाखवत असतात. रामशेठ यांचे वैशिष्ट्य हे आहे की, आम्ही लोक आदिवासी भागात गेलो. संस्थेची शाखा त्या ठिकाणी आहे. सगळे काम बघितले. काही कमतरता जाणवल्यावर रामशेठ यांना सांगितले की इतके पैसे जाहीर करा. त्यानुसार त्यांनी अशा अनेक शाखांमध्ये अर्थसहाय्य केलेले आहे. पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श रामशेठ यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. म्हणून याही शाखेला त्यांनी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो.
निढळ गावचे सुपुत्र तथा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या पुढाकारातून आणि संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलेल्या 75 लाख रुपये देणगीतून इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्याला दिशादर्शक ठरणारी शाळेची अद्ययावत आणि सर्व सुविधांनी युक्त इमारत निढळमध्ये उभारण्यात आली आहे. संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग, सुसज्य स्टाफरूम, बोलक्या भिंती, मुख्याध्यापक कक्ष, रंगरंगोटी, नवीन बेंचेस, अत्याधुनिक डिजिटल बोर्ड अशा अनेक सुविधा विद्यार्थी आणि शिक्षकांना देण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी या वेळी दिली.
या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर, हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ, माजी विद्यार्थी विजय जाधव, कला शिक्षक प्रदीप कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या आणि विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.
कार्यक्रमास संस्थेचे व्हॉईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आमदार विश्वजीत कदम, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, अॅड. रवींद्र पवार, डॉ. सदाशिव कदम, डॉ. विठ्ठल शिवणकर, सांगली दक्षिण विभागीय चेअरमन डॉ. एम.बी. शेख, संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. राजेंद्र मोरे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, पीआरओ बाळासाहेब कारंडे यांच्यासह पदाधिकारी, रयत सेवक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.