कर्जत : बातमीदार
श्री समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून नेरळकरांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ठाणे येथील तक्षशिला नृत्यकला मंदिराच्या कलाकारांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून ‘रंगू कीर्तनाचे रंगी, साधू नवविधा भक्ती’ याच्या माध्यमातून नवविध भक्तीची विविध रूपे साकारली.
नेरळमधील बापूराव धारप सभागृहात दिवाळी पहाटनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या पुढाकाराने तक्षशिला नृत्य कला मंदिर या संस्थेच्या काश्मिरा पंडित यांनी नवविधा भक्तीची रूपे उलगडली. त्यांना स्वाती बदले, श्रेया मडकेकर, साक्षी कुलकर्णी, सानिका देवळेकर, वृषाली सकपाळ, वैष्णवी सावंत, मयुरा पावसकर, रुची कारभारी, भारती पालकर यांनी नृत्याचा आविष्कार सादर केला. या सर्व कलाकारांनी काश्मिरा पंडित यांच्या साथीने शिवार्पणम, सूर्य उपासना, मराठी आरतीवर आधारित दशावतार, कृष्णलीला, रामायण सादर केले.
दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरुवात गणपतीचा श्लोक या नृत्यातून करण्यात आली. त्या वेळी काश्मिरा त्रिवेदी यांनी रंगू कीर्तनाचे रंगी, साधू नवविधा भक्ती हे नृत्यनाट्य केले. या अनोख्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला नेरळमधील नागरिकांनी गर्दी केली होती.