नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचा निकाल एका दिवसावर असून त्यात काँग्रेसला मोठे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातील चार मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सिद्धू यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर आरोप केले होते. धार्मिक पुस्तकातील उल्लेखावरून मुख्यमंत्री आणि अकाली दल यांच्यात सामोपचार झाल्याचा आरोप सिद्धू यांनी केला होता, तर अमरिंदर सिंग यांच्यामुळे आपले तिकीट कापण्यात आल्याचा आरोप सिद्धू यांच्या पत्नीने केला होता. त्यावर सिद्धू म्हणाले होते की, आपली पत्नी कधीही खोटे बोलत नाही. तेव्हापासून हा वाद सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि पंजाब प्रचार समितीचे प्रमुख लाल सिंग यांनीदेखील सिद्धू यांच्याविरुद्ध एल्गार पुकारला आहे, तर पंजाब सरकारमधील मंत्री त्रिपत राजेंद्र सिंह बाजवा, भारत भूषण आशू, श्याम सुंदर अरोडा आणि राणा गुरमीत सिंह यांनीदेखील सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. बाजवा म्हणाले की, सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नेतृत्व मान्य नसेल, तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, तसेच सिद्धू नैतिकतेने मजबूत असतील, तर त्यांनी खुर्चीचा मोह सोडून द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. बाजवा यांच्या सुरात सूर मिसळवत अमरिंदर यांनीदेखील सिद्धूंना टोला लगावला होता.