श्रीवर्धन ः प्रतिनिधी
संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणला साडेतीन महिन्यांचा कालावधी लागला.
श्रीवर्धनमध्ये अनेक लहान-मोठे उद्योजक आहेत. त्यांचे कामकाज वीजपुरवठ्यावर अवलंबून आहे. पावसाळा संपत असताना महावितरणची वारंवार दुरुस्तीची कामे का निघतात हा उत्सुकतेचा विषय आहे. अनेकदा सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येतो, तर कधी दुपारी 2 ते सायंकाळी 6 असा अर्धा दिवस वीजपुरवठा खंडित होतो. श्रीवर्धनमधील मच्छीमारांना पकडलेली मासळी थंड करण्यासाठी बर्फाची आवश्यकता असते, मात्र दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्याने बर्फाच्या फॅक्टरीमध्ये बर्फही तयार होत नाही.
पर्यटन व्यावसायिक आता आपला व्यवसाय सुरू करण्याच्या मार्गावर आहेत, परंतु वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना दुरुस्तीची कामे करता येत नाहीत. परिणामी महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.