Breaking News

मावळच्या निकालासाठी उजाडणार रात्र

पिंपरी ः प्रतिनिधी

मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. प्रथमच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल येण्यासाठी सुमारे 15 तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचा अंतिम निकाल मिळण्यास रात्र उजाडणार आहे.

मावळ मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन केले आहे. या ठिकाणी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. एकाच वेळी मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मतमोजणीवेळी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

गुरुवारी सकाळी आठ वाजता इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. त्यानंतर पोस्टल मतांची गणना होईल. त्यानंतर एका फेरीस 45 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. ईव्हीएमची मते मोजण्यास अधिक कालावधी लागला तरी काही वेळाने 35 मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण होईल. एका विधानसभा मतदारसंघाकरिता किमान 14 टेबल लावली आहेत. 29 फेर्‍यांपर्यंत मोजणी होणार असल्याने निकाल येण्यासाठी 14 ते 15 तास लागणार आहेत. 2504 ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी किमान 10 तास व त्यानंतर व्हीव्हीपॅटसाठी चार तास लागतील, असा अंदाज आहे. मतमोजणीचा अंतिम निकाल देण्यास रात्रीचे 10 ते 11 वाजण्याची शक्यता आहे.

निकालापूर्वीच रंगल्या चर्चा

मावळ लोकसभा मतदारसंघात रिंगणात एकूण 21 उमेदवार होते. युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अशी येथे दुरंगी लढत आहे. लोकसभा मतदारसंघात यंदा 59.49 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात मावळची जागा काही ठिकाणी युतीला आणि आघाडीलाही जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या समर्थकांमध्ये चुरशीची लढत आहे.

तीन निरीक्षकांची नेमणूक

निवडणूक आयोगाने या वेळी तीन निवडणूक निरीक्षक नेमले आहेत. दोन विधानसभा मतदारसंघांमागे एक असे सहा मतदारसंघासाठी तीन निरीक्षक आहेत. तीनही निरीक्षक सोमवारी सायंकाळी शहरात आले असून, त्यांनी स्ट्राँग रूमसह मतदान मोजणी केंद्राचा आढावा घेतला आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply