दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींचा चित्रपट म्हणजे, स्वच्छ, निखळ, कौटुंबिक मनोरंजनाची हमी. (एखादा बुढ्ढा मिल गया रहस्यरंजक तसाच एखादा संगीतमय आलाप फसलेला. चालायचंच. काही गोष्टी इकडेतिकडे होणारच.)
असाच त्यांचा मस्त जमलेला मनोरंजक चित्रपट बावर्ची. मुंबईत रिलीज 7 जुलै 1972. बघा ना, तब्बल बावन्न वर्ष होऊनदेखील तो आपल्या डोळ्यासमोर आहे. पुन्हा पुन्हा एन्जॉय करता येतोय. यशस्वी चित्रपटाची हीच तर ताकद व ओळख असते. काळ बदलत राहिला तरी त्या कलाकृतीची खासियत कायम राहते.
इट इज सो सिंपल टू बी हॅपी…. बट इट इज डिफिकल्ट टू बी सिंपल…
‘बावर्ची’च्या रघुचे (राजेश खन्ना) हे असे सरळ सोपे असे आयुष्याचे तत्वज्ञान. प्रत्येक चित्रपटाचे आपले एक व्यक्तिमत्व असतेच असते. ’निमल’ वेगळा नि ‘मुंज्या’ वेगळा. आजही ‘बावर्ची’चा सरळ साधा स्वभाव खूप आकर्षित करतो हे या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे. आजच्या वेगवान जीवनशैलीतही हा चित्रपट वेळ काढून पहावा आणि रिचार्ज व्हावे. राजेश खन्नाच्या काही वैशिष्ट्यांतील एक म्हणजे, तो हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटासाठी अर्धे वा सर्वसाधारण मानधन घेई. याचाच अर्थ तो दर्जेदार कामाची कदर करीत असे. ‘बावर्ची’चे मुंबई वितरण विभागात हक्क शक्ती सामंता व राजेश खन्ना यांच्या शक्ती राज फिल्म या वितरण संस्थेकडे होते. या जोडीने त्या काळात आणखी काही चित्रपट वितरित केले. (अनुराग वगैरे. तो शक्ती सामंता यांचाच चित्रपट व राजेश खन्ना विशेष भूमिकेत.) राजेश खन्नाने आविष्कार या चित्रपटासाठी निर्माता व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांजकडूनही कमी मानधन घेऊन चांगल्या कलाकृतीला प्राधान्य दिले. सुपर स्टार असला तरी तो समजदार होता, संस्कारी होता.
त्या दिवसात ’आनंद’ (1971)नंतरचा दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी आणि सुपर स्टार राजेश खन्ना यांचा चित्रपट कोणता बरे असेल याची चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यम आणि चित्रपट रसिकांना उत्सुकता असतानाच ’बावर्ची’च्या चित्रीकरणास सुरुवात झाली. अंधेरी कुर्ला रोडवरील मोहन स्टुडिओ हृषिदांचा विशेष आवडता. आपल्या अनेक चित्रपटांचे मुहूर्त आणि चित्रीकरण त्यांनी मोहन स्टुडिओतच केले. (दिग्दर्शक आणि त्याचा आवडता स्टुडिओ हेही एक विशेष समीकरण) खरंतर राजेश खन्नाच्या सुपर स्टारचा झंझावात सुरू असतानाचा हा काळ होता. त्याची डायरी दोनेक वर्ष फुल्ल आहे असे म्हटले जाई. त्याची बातमी होई. राजेश खन्ना म्हणजे कलरफुल बातमी असे ते दिवस होते. ’या चित्रपटाच्या सेटवरून त्या चित्रपटाच्या सेटवर’ अशी जणू पळापळ करीत राजेश खन्नाने दिवसातील दोन तीन तास काढत ’आनंद’ला उत्कटपणे न्याय दिला (या चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक दुर्मिळ किस्से, आठवणी रमेश देव सांगत.) ’आनंद’च्या भावपूर्ण यशानंतर राजेश खन्नाला हृषिदांच्या दिग्दर्शनात अधिकाधिक मोकळेढाकळेपणाने वावरणारी व्यक्तिरेखा हवी होती. तपन सिन्हा लिखित व दिग्दर्शित ’गलयो होईओ सत्ती’ (1966) या बंगाली चित्रपटावर आधारित ’बावर्ची’ निर्माण करायचं ठरले. ’आनंद’चेच निर्माते हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, रोमू एन. सिप्पी यांनी ’बावर्ची’ निर्मितीचे पाऊल टाकले आणि राजेश खन्नाच्या सहकार्यातून वर्षभरात चित्रपट पूर्ण करीत प्रदर्शितही केला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर मेट्रो (नि जोडीला मिनर्व्हाही) होते हे विशेष. मध्यमवर्गीय रसिकांना आपलंस वाटेल असे हे निर्भेळ मनोरंजन होते. त्या काळाशी सुसंगत स्वच्छ दिलखुलास मनोरंजन. राजेश खन्नाच्या विलक्षण क्रेझ असल्याच्या दिवसांतील हा चित्रपट. तरी बरं बावर्ची रूपात त्याने चित्रपटभर टोपी घातलीय नि हेअरस्टाईल त्यात लपली गेलीय. त्याने अभिनय मात्र उत्फूर्त केलाय.
रघू (अर्थात राजेश खन्ना) शांती निवासमध्ये राहत असलेल्या शर्मा आडनावाच्या एका भल्या मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीत ’बावर्ची’ (स्वयंपाकी वा आचारी) म्हणून येतो आणि आपल्या खेळकर, खोडकर, मिस्कील, बडबड्या स्वभावाने मग या कुटुंबातील भाऊ भाऊ, जावा जावा, चुलत भावंड यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टीतील अभिमान, व्यर्थ वाद, काहीसा असलेला वा दडलेला अहंकार बाजूला पडत जातो. या कुटुंबाच्या एकूणच वागण्याला, त्रासाला कंटाळून या टुमदार निवासात कोणी स्वयंपाकी टिकत नसतो असेही एक वैशिष्ट्य. रघू एक प्रकारे ’कुटुंब क्रांती’ करतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे थोडेसे विस्कळीत होत जात असलेले नातेसंबंध तो हसत खेळत जुळवून आणतो, कुटुंबात वा घरात सकारात्मक दिलखुलास वातावरण निर्माण करतो असे या चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र. हा सगळा कुटुंब कबिला छान हसते खेळते आयुष्य जगू लागते. त्यांच्या हरवलेल्या जुन्या सवयी पुन्हा एकदा जाग्या होतात. रघु त्यांना आपल्या कुटुंबातीलच एक वाटतो.
या कुटुंबात जया भादुरी (तोपर्यंत ती बच्चन झाली नव्हती.), उषा किरण, दुर्गा खोटे, हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय, ए.के. हनगल, असरानी, मा. राजू हे कलाकार. गुणी कलाकारांची एक सक्षम फळीच हृषिदांनी जमवली. (येथे दिग्दर्शक दिसतो म्हणूया) आणि त्यांचा वापरही उत्तम रितीने केला. तोही असा की ’भोर आयो…’ या गाण्यावर दुर्गा खोटे यांचा चक्क पद्न्यास पहायला मिळतो. काय छान एक्स्प्रेशन्स दिलीत हो त्यांनी. कम्माल. असरानी संगीतकार रजनीकांत न्यारेलाल यांचा (हे नाव कोणावरून ते सांगायची गरज नाहीच.) सहाय्यक विश्वनाथ शर्मा. त्याचे काम एकच, विदेशी गीत संगीत ऐकून त्यावरुन काही सुचतयं का (खरंतर कॉपीच) हे पहायचे. हिंदी चित्रपट संगीतात तेव्हा ते होऊ लागले होते. संस्कृत नाटकाच्या सूत्रधाराप्रमाणे अमिताभ बच्चन कथेचे सार सांगायला सुरुवात करतो आणि चित्रपट सुरू होतो आणि हृषिदा आपल्याला रघुच्या माध्यमातून शांती निवासमध्ये घेऊन जातात. चित्रपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन म्हणतो, रघू किसी नये घर की तलाश मे जा रहा है… आशा है वो आपका घर नहीं होगा… गुलजार यांचा हा संवाद अखेरीस छान गुगली टाकतो. संपूर्ण चित्रपटात गुलजार यांच्या संवादांची खुसखुशीत मेजवानी आहे. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला शहरात एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू मागे पडायला सुरुवात झाली होती (पण तीच आवश्यक होती) अशा वेळी त्याच एकत्र कुटुंब पद्धतीतील गोडवा आणि जिव्हाळा या चित्रपटात वेगळ्या पद्धतीने रंगतो. हृषिकेश मुखर्जी स्वतः चित्रपट संकलनाचे जाणकार असल्याने या छोटेखानी चित्रपटाची गती त्यांनी उत्तम राखलीय. चित्रपटाचे संकलक दास धायमाडे यांनी अंतिम आकार उत्तम दिला आहे. संकलन चित्रपटाची भाषा स्पष्ट करतो. हृषिदांच्या चित्रपटाचे हुकमी छायाचित्रणकार जयवंत पाठारे यांनी चित्रपटाचा मूड चांगला पकडलाय. कैफी आझमी यांच्या गीताना मदन मोहन यांचे संगीत आहे. तुम बिन जीवन कैसा जीवन (पार्श्वगायक मन्ना डे), भोर आई गया अधिपारा (किशोरकुमार, मन्ना डे, हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय, लक्ष्मी शंकर), मस्त पवन डोला रे (लता मंगेशकर), मेरे नैना बहाल नीर (लता मंगेशकर) या गाण्यांचा यात समावेश आहे. नृत्य दिग्दर्शन गोपीकृष्ण यांचे आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील ही गाणी आहेत.
‘बावर्ची’च्या निर्मितीतील एक बहुचर्चित गोष्ट सांगायलाच हवी. खरंतर गॉसिप्स. अमिताभ बच्चन व जया भादुरी यांचे एक नजर, बन्सी बिरजू या चित्रपटातून एकत्र काम करता करता सूत जमले. ते बरेच जवळ आले आणि आता तर बावर्चीच्या सेटवर जया भादुरीला भेटायला अमिताभ यायचा. अर्थात आनंद रिलीजनंतरचे हे दिवस. अमिताभ व जया दोघेही हृषिदांचे लाडके, पण अमिताभ जयाला भेटायला सेटवर येतोय हे राजेश खन्नाला आवडत नव्हते. अधूनमधून तो यावरून शेरेबाजी करायचा. एकदा मात्र जयाचा संयम सुटला, ती तडकली आणि एक दिवस अमिताभचा असेल वगैरे तिने त्याला ऐकवले हा किस्सा गाजला. इतका की आजही तो खुलवून रंगवून सांगितला जातो. गॉसिप्सला खतपाणी हे तर नेहमीचेच.
’बावर्ची’ची त्यानंतर तमिळ भाषेत तसेच कन्नड भाषेत दोनदा रिमेक झाली. एकदा नाव होते, नंबर 73 शांती निवास. मराठीत कोणालाच या चित्रपटाची रिमेक करावीशी वाटली नाही हे चांगले की वाईट? फार पूर्वीच झाली असती तर नक्कीच रंगली असती. (राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा लेखक अभिजित घोष याने म्हटलंय, मुन्नाभाई हसत खेळत मांडायची प्रेरणा बावर्ची पाहून घेतली.) चित्रपटाचा आशय कौटुंबिक आनंद घेणारा असल्याने त्याची रिमेक होणे स्वाभाविक. दिग्दर्शक डेव्हिड धवनने गोविंदाला घेऊन ’हीरो नंबर वन’ नावाने रिमेक केली (ही हुकमी नि जमलेली अशी दिग्दर्शक व कलाकार जोडी.) पण मूळ चित्रपटातील सहजता आणि साधेपण त्यात हरवले होते आणि तद्दन विनोदी चित्रपट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचे हसे झाले. गोविंदाकडून काय अपेक्षा ठेवायची असंही कोणी कोणी म्हटलं. हृषिकेश मुखर्जी म्हणजे मध्यमवर्गीय आणि मध्यममार्गी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले गेल्याने त्यांच्या यशस्वी चित्रपटांचे प्रमाण जास्त आहे आणि त्यांच्या दिग्दर्शनाबाबत चित्रपटसृष्टी, रसिक प्रेक्षक व प्रसारमाध्यमात आपुलकी आणि विश्वासार्हता होती. त्यांच्या दिग्दर्शनीय चित्रपटांचे प्रगती पुस्तक सांगायचे तर मुसाफिर (1957), अनाडी (1959), अनुराधा (1960), असली नकली (1962), अनुपमा (1966), आनंद, गुड्डी, बुढ्ढा मिल गया (तीनही 1971), अभिमान, नमक हराम (दोन्ही 1973), चुपके चुपके, चैताली, मिली (तीनही 1975), गोलमाल, जुर्माना (दोन्ही 1979), खुबसुरत (1980), बेमिसाल (1982) इत्यादी अनेक चित्रपट आहेत. त्यातील ’बावर्ची’ स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेला आणि बावन्न वर्षानंतरही तितकाच तजेलदार आणि हलका फुलका चित्रपट आहे. सत्तरच्या दशकात नंतर तो मॅटीनी शोला तसेच दूरदर्शनवर पहायला गेला. नंतरच्या काळात व्हिडीओ, चॅनल, यू ट्यूब चॅनल असा पहायला जातोय. एक चित्रपट असा प्रवास करत करत वाटचाल करतो. तुम्ही अद्याप पाह्यला नसेल तर आवर्जून पहालच आणि यापूर्वी अनेकदा एन्जॉय केला असेल तर पुन्हा करा. स्वच्छ मनोरंजक चित्रपट म्हणून आजही ओळखला जातोय.
अशातच एके दिवशी बातमी आली, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद, मिली व बावर्ची आणि गुलजार दिग्दर्शित कोशिश या चित्रपटांचा रिमेक करण्यात येतेय. आता जुन्या चित्रपटाची रिमेक हा फंडा नवीन नाही, पण काही चित्रपटांची रिमेक नको हो. त्याची मूळ प्रतिमाच कायम राहूदेत. हे चित्रपट पुन्हा पुन्हा अनेकदा पाहिले गेले, आवर्जून पाहिले जातात, यू ट्यूबवर उपलब्ध आहेत तर मग रिमेकने काय बरे साध्य होणार? ‘बावर्ची’चा रिमेक कोण करतेय? निर्माते आहेत, अब्बास सेनगुप्ता जादुगर यांची जादुगर फिल्म आणि समीर राज सिप्पी. (मूळ ‘बावर्ची’च्या निर्मात्यांमधील एन. सी. सिप्पी यांचा नातू) तर दिग्दर्शिका आहे अनुश्री मेहता. (मिसेस अंडरकव्हर या चित्रपटाची दिग्दर्शिका. या चित्रपटात राधिका आपटे आहे.) अनुश्री दत्ता हृषिकेश मुखर्जी व मनमोहन देसाई यांची जबरदस्त चाहती आहे. बावर्ची, चुपके चुपके, अमर अकबर अॅन्थनी, मिस्टर इंडिया हे तिचे फेवरेट चित्रपट. यावरुन तिला पारंपरिक लोकप्रिय मनोरंजक चित्रपट आवडतात असे दिसते. म्हणून काय तिने ‘बावर्ची’च्या रिमेकचा विचार करायचा? जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले, धीस फिल्म इज द ग्रेट इंडियन जॉईंट फॅमिली इज न एुींळपलीं कॉन्सेप्ट. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये रणवीर सिंग फिट्ट बसेल असे म्हटलेय. त्यांच्या मताशी सहमत व्हायचं का? आज एकत्र कुटुंब पद्धती किती प्रमाणात शिल्लक आहे. शहरी नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्गात सातत्याने एकाद्या छान फूड पॉईंटवरून खाणे मागवले जातेय. कुटुंबाचा आचारी अथवा कुटुंबातीलच एक झालेला घरातील सर्व कामे करणारा ही कॉन्सेप्ट आज शिल्लक ती किती आहे? ‘बावर्ची’चा रिमेक करताना हे सामाजिक, कौटुंबिक भान ठेवले तर बरे. जगणचं बदललंय तसा बावर्ची ही बदललाय आणि तो आचारी न राहता कूक अथवा शेफ झालाय. ऐसपैस घरात फॅशनेबल किचन आलेय. पारंपरिक खाद्य संस्कृतीच्या जोडीला इटालियन फूड्स, रशियन फूड्स असे अनेक इंटरनॅशनल फूड्स आलीत. या सगळ्यात हा कूक अथवा शेफ त्या घरातील कुटुंबातील सुख-दुःखे ओळखणार कधी नि हलकी करणार कशी नि कधी?
‘बावर्ची’चा काळच वेगळा होता. तरी चित्रपट आजही एन्जॉय करता येतोय तर मग पोट भरायला हवे तरी काय? आजच्या फास्ट फूड संस्कृतीने हा चित्रपट अवश्य पहावा नि एन्जॉय करावा.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)