Breaking News

महामार्गावरील दिवाबत्ती नवी मुंबई महापालिकेकडे

नवी मुंबई : बातमीदार

सायन-पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महापालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापि या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने नवी मुंबई महापालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते, मात्र आता सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची जबाबदारी महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे.

सायन-पनवेल महामार्गावर नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विद्युत पथदीप दुरुस्ती व देखभालीसाठी महानगरपालिकेकडे  हस्तांतरीत करण्यात यावेत अशी मागणी महानगरपालिकेमार्फत सातत्याने केली जात होती. याबाबत महापालिका व शासन स्तरावर वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या. याबाबत अंतिम निर्णय झाला असून वाशी टोलनाका ते कोकण भवन या सायन-पनवेल रस्त्यावरील सर्व पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, विदयुत यंत्रणा व विद्युत मीटर नवी मुंबई महापालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडून हस्तांतरित करण्यात येत असलेले पत्र महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांस देण्यात आलेले आहे.

पथदिवे हस्तांतरीत करण्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीकरिता लागणार्‍या अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक महानगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागास देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागामार्फत याबाबतची पडताळणी करण्यात येऊन आठ कोटी 29 लाख रुपये इतकी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावरील पादचारी भुयारी मार्ग, नेरुळ येथील दोन पादचारी भुयारी मार्ग व एसबीआय कॉलनी येथील भुयारी मार्ग असे एकूण चार पादचारी भुयारी मार्ग हे देखभाल व दुरुस्तीकरीता नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply