Breaking News

विकासकामांमुळे जनता नक्की साथ देईल -आमदार महेश बालदी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
गेल्या पाच वर्षात उरण विधानसभा मतदारसंघातील गावागावात, वाड्या-वस्त्यांवर विकासाचा निधी देऊन अनेक कामे केली आहेत. त्या जनतेच्या पाठबळावर व उमद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय संपादन करू. जनता मला नक्की साथ देईल, असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 20) व्यक्त केला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उरणच्या जेएनपीटी कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार महेश बालदी बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उरण विधानसभा प्रभारी श्रीनंद पटवर्धन, तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, सुधीर घरत, जितेंद्र घरत आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आमदार महेश बालदी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. माझ्या अगोदर येथे जे आमदार होते त्यांनी मतदारसंघात कोणताच विकास केला नसल्याने जनतेने त्यांना घरी बसविले, असे सांगून त्यांच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी मुद्दाच नसल्याने ते जातीचा आधार घेऊन समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत, मात्र येणारी ही निवडणूक जातीपातीच्या मुद्द्याची नसून विकासाच्या मुद्द्याची असल्याचे आमदार बालदी यांनी स्पष्ट केले. मी जनतेच्या घराघरात विकास पोहचविला असल्याने जनता मला नक्की साथ देईल, असेही ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात जेएनपीटीसाठी आठ पदरी मार्ग, दीडशे कोटी रुपयांचे करंजा बंदर, त्याचप्रमाणे ऐतिहासिक घारापुरी बेटावर स्वातंत्र्यानंतर वीज नेण्याचे काम मी केले असल्याचे आमदार महेश बालदी यांनी नमूद केले. मतदारसंघातील आदिवासी वाड्यांवर रस्ते बनवून त्यांचा सर्वांगीण विकास सुरू केला असून रानसई आदिवासी वाडीवर जाऊन विरोधकांनी ते पाहून घ्यावे. आम्ही फक्त गप्पा न मारता वास्तववादी विकासाला प्राधान्य देत असल्याने तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये दाखल होत आहे आणि तरुणवर्गाची ही ताकद माझा विजय सुकर करेल. विरोधकांनी कोणीही उमेदवार दिला तरी मी किमान 25 हजारांच्या मताधिक्याने निवडून येईन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून विरोधकांची दिवास्वप्ने उद्ध्वस्त करा, असे आवाहन केले. भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही मार्गदर्शन केले.
या वेळी आवरे, मोठी जुई, फुंडे, चिरनेर, डोंगरी आदी ठिकाणच्या विविध पक्षातील सुमारे अडीचशेच्या वर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले.
मेळाव्यास माजी जि.प. सदस्य विजय भोईर, जीवन गावंड, भाजपचे उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, जासई विभाग अध्यक्ष गोपी म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी तसेच अतुल पाटील, राजेश ठाकूर, हितेश शाह, संगीता पाटील, शमिता दत्ता ठाकूर, मनीषा म्हात्रे, हस्तीमल मेहता आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रक्तदान शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रक्तदान केले. सुमारे 96 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते देवळोली येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील देवळोली गावात आमदार महेश बालदी यांच्या 13 लाख …

Leave a Reply