Breaking News

माणगाव सिद्धिनगर विकासकामांपासून दुर्लक्षित

भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सत्वेंचा आक्षेप

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धिनगरचा भाग विकास कामांपासून पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आक्षेप या भागातील रहिवाशी तथा भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी घेऊन भागातील व्यथा प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविल्या.

सत्वे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत नगरपंचायतीतील सत्ताधार्‍यांनी या भागाकडे लक्षच दिले नाही. नगरपंचायत हद्दीतील पूर्वीच्या 14 नंबर वार्डांतील सिद्धिनगर भागाकडे कोणीच  विकासकामांच्या बाबतीत लक्ष दिले नाही. या ठिकाणी सरलादेवी हॉलकडे जाणारा जो रस्ता तयार करण्यात आला त्याचेही काम चांगल्या प्रकारे करण्यात आले नाही. या रस्त्यावर  जागोजागी पावसाळ्यात पाणी साचते.त्यामुळे पावसाळ्यात नगरातील ग्रामस्थांचे हाल होतात, तसेच नगरातील अंतर्गत रस्त्यांची आजघडीला दुरवस्था झाली आहे. याकडे कोणी लक्ष दिले नसल्याने दरवर्षी सिद्धिनगरातील रहिवाशांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाकडून पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात जलमय स्थिती निर्माण होते. या नगरात विजेच्या खांबांचा प्रश्न गेली अनेक वर्षे खितपत पडला आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी अथवा नगरपंचायत लक्ष देत नाही. एकंदरीत हा भाग विकासापासून दुर्लक्षित असून, या नगरातील हे प्रश्न नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी तातडीने सोडवावेत; अन्यथा नगरातील ग्रामस्थ नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन धरतील, असा इशाराही शर्मिला सत्वे यांनी दिला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply