Breaking News

रायगडातील माळराने रानफुलांनी बहरली

माणगाव ः प्रतिनिधी

पावसाळ्याच्या दिवसात रानफुलांना बहर आला असून माळरानावर गवत फुलांचा सडा पसरला आहे. संततधार पडणारा पाऊस, पावसाळ्यातील आल्हाददायक गारवा यामुळे रायगड जिल्ह्यातील माळराने विविध फुलांनी बहरली आहेत.

निसर्ग आणि पर्यावरणाच्या विविधतेने रायगड जिल्ह्यातील जंगल समृद्ध आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तालुक्यातील माळरानावर, डोंगरावर विविध प्रकारच्या फुले, वनस्पती उगवतात. साधारणतः आषाढ, श्रावण, भाद्रपद महिन्यात विविध रानफुलांना बहर येतो. याच काळात विविध धार्मिक सण असतात. या सणात धार्मिक विधींसाठी याच फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तेरडा, रानभेंडी, सोनकी, रानआलं, गेंद, मोतीया व कवाली- अग्निफुले इत्यादी फुले मुबलक प्रमाणात माळरानावर बहरत असून अतिशय विहंगम असे दृश्य मालरानावर दिसत आहेत.

पर्यटक निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी असून अनेक हौशी निसर्गप्रेमी या मालरानावर भेटी देत आहेत. पान कुसुम (फॉरेस्ट स्पायडर लीली), खाजकांदे ,सुवासिक सफेद मूसली, कर्णफुल, फोंडशी, रान हळद, सीतेची वेणी, अंजनी, भारंगी, कुड्याची फुले, कर्टुल्याची फुले, रान दोडगा, शेरवड आदी फुले माळरानावर बहरत आहेत. साधारणतः 50 ते 60 प्रकारची विविध फुले माळरानावर बहरली आहेत.

माळरानावर विविध गवत फुले, रानफुले बहरली आहेत. कोकणात रान फुलांचा पावसाळ्यातील बहर हा मोठा ठेवा आहे. विविध रंगांची ही फुले आकर्षक आहेत. अतिशय निसर्ग संपन्न या जंगलांचे संवर्धन व्हावला हवे. या फुलांचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.

-विलास देगावकर, निसर्गप्रेमी

पावसाळ्यात माळरानावर उगवणार्‍या वनस्पती व विविध रंगांची फुले ही निसर्गाची किमया आहे. या फुलांचे आयुष्य काही तास ते काही दिवसांचे असते. विशिष्ठ हवामानात ही फुले फुलून येत असल्याने निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.

-हेमंत बारटक्के, निसर्गप्रेमी

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply