Breaking News

काँग्रेसच्या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये तीव्र निषेध

पनवेल ः रामप्रहर वृत्त
परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत आहेत. आरक्षण संपवण्याचा मनसुबा त्यांनी अमेरिकेत व्यक्त केला. काँग्रेसच्या या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल, असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिका दौर्‍यादरम्यान वॉशिंग्टनमधील जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना केले. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही, मात्र त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड झाला आहे.
काँग्रेसच्या या आरक्षणविरोधी भूमिकेचा धिक्कार करण्यासाठी पनवेल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू शिद, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष कमला देशेकर, अनंता गायकवाड, अविनाश गायकवाड, दीपक शिंदे, ज्योती देशमाने, विद्या तामखडे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात सर्व समाजाचे लोकं एकोप्याने राहत असताना राहुल गांधी नेहमीच देशाच्या विरोधात भूमिका मांडत असतात. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी व काँग्रेसचे वक्तव्य तर अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत या वेळी आंदोलनातून व्यक्त करण्यात आले तसेच भाजप व सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही देण्याबरोबरच आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास आम्ही हाणून पाडू, असा इशाराही या आंदोलनातून भाजपकडून देेण्यात आला.
आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणे हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी व काँग्रेसने केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही, असे स्पष्ट करीत आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला.
राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोलले आहेत. एका बाजूला निवडणुकीत खोटे कथानक तयार करायचे आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट करायची हे अतिशय चुकीचे आहे. काँग्रेसने भारताच्या संविधानाचा आणि संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कधीच सन्मान केला नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना लोकसभेवरही निवडून जाऊ दिले नाही. दोनवेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारा हाच काँग्रेस पक्ष मतसांसाठी कशा पद्धतीने खोटे कथानक तयार करतो हे राहुल गांधींच्या विधानाने स्पष्ट झाले आहे. भाजप आरक्षणाच्या बाजूने असून आम्ही हे आरक्षण बंद करू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील या आंदोलनातून भाजपने दिली.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply