Breaking News

कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता

पनवेल : रामप्रहर वृत्त
कळंबोली सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा 15.53 किलोमीटरचा एक महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्यामुळे कळंबोली जंक्शनची वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका होणार आहे. यासाठी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केलेली मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे.
कळंबोली सर्कलवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली ते पनवेल-उरण-जवाहलाल नेहरू बंदराकडे जाणार्‍या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. पनवेल-उरण ते मुंबई-ठाणेकडून हि वाहतूक जेएनपीटी कडे ये-जा होत असताना अवजड कंटेनर, प्रवासी वाहतूक कळंबोली एमजीएम सर्कल येथून येथून मार्गक्रमण करीत असते, त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे.
या सर्व ठिकाणी, स्थलांतरित किंवा कंटेनर वाहतूक चोवीस तास चालू आहे आणि या कारणास्तव, वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच परिसरात भेडसावते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जाते. त्याचबरोबर येथून धावणार्‍या वाहनांची प्रचंड संख्या असल्याने कळंबोली येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते व ती सुरळीत करण्यामध्ये पोलीसांचाही बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती व त्या संदर्भात पाठपुरावा केला होता.
दरम्यान, वाहतुकीच्या या दैनंदिन समस्येवर मार्ग काढून जनतेची वाहतुक खोळंब्यातून सुटका करण्यासाठी सर्व संबंधीतांच्या बैठका घेऊन उपाययोजना सुचविण्यात आल्या. त्या अनुषंगाने नामदार नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली जंक्शन येथील वाहतुक समस्येवर वाहतुकीमध्ये काही भरीव बदल करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. या कामाची लवकरच निविदा प्रक्रिया होणार होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
उर्वरित महाराष्ट्राला जोडणारा कळंबोली सर्कल हा महत्त्वाचा दुवा आहे. या सर्कलच्या विस्तारीकरणाला नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे वाहनचालकांचे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. या विकासकामासाठी होणार्‍या खर्चाला मान्यता दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी नामदार नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नियुक्त

कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करण्यासाठी जेएनपीए, सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमाभागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधील पॅकेज पाचमध्ये कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या बाजूकडील एक्झिटवर चक्राकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित होते. या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply