आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिनंदन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सात जणांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली आहे. उपसभापती नीलम गोर्हे यांच्या उपस्थितीत या सात जणांना मंगळवारी (दि. 15) आमदारकीची शपथ देण्यात आली.
विधान परिषदेसाठी भाजपकडून बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज राठोड, भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ; शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील, प्रवक्त्या माजी आमदार मनीषा कायंदे; तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार पंकज भुजबळ व अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष इद्रिस इलियास नायकवाडी यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर आमदार विक्रांत पाटील यांचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे आदी पदाधिकार्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच या नियुक्तीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह पदाधिकार्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन पनवेलकरांच्या वतीने त्यांचे आभार मानले.
या वेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील तसेच तानाजी खंडागळे, समीर कदम, प्रशांत कदम आदी उपस्थित होते.