Breaking News

कळंबोली सेक्टर 14मध्येे नवीन वीजवाहिनी आणि पिलर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार विजेच्या लपंडावावर महावितरणचा उपाय!

पनवेल ः रामप्रहर वृत्त
गेल्या काही महिन्यांपासून कळंबोली सेक्टर 14 येथे विजेचा लपंडाव सुरू होता. जुनाट आणि कमी क्षमतेची केबल, त्याचबरोबर वाढलेला लोड यामुळे ही समस्या उद्भवली होती. याबाबत स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातल्याने या परिसरामध्ये नव्याने वीजवाहिनी टाकून पिलरसुद्धा बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता हजारो वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. म्हणून येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
कळंबोली से. 14 येथे बीयुडीपीची घरे आहेत. या ठिकाणी अल्प आणि मध्यमवर्गीय लोक वास्तव्यास आहेत. दरम्यान, नियमित वीज बिल भरणा केला जात असतानाही या ठिकाणचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. केबल फॉल्ट होणे, त्याचबरोबर स्पार्क आणि ट्रान्सफार्मामध्ये बिघाड या कारणाने रात्रीच्या वेळी तासन्तास बत्ती गुल होत होती. त्यातच नवरात्रोत्सव सुरू असून पहिल्या आणि तिसर्‍या माळेला पूर्णपणे अंधार झाला होता. परिणामी भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.
या परिसरात अखंडीत वीजपुरवठा व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठक घेतली होती तसेच या संदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावी, असे सूचित केले होते. सेक्टर 14 येथील वीज प्रश्नावर कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी महावितरण कंपनीला पत्र दिले होते. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनीसुद्धा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. दरम्यान, यामध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि कळंबोलीचे सहाय्यक अभियंता यांनी स्वतः गांभीर्याने लक्ष घालून सेक्टर 14 येथील वीजवाहिनी बदलली आहे. अगोदर या ठिकाणी 70 केव्हीची केबल होती. एकूण विजेची मागणी पाहता त्याची क्षमता कमी असल्याने हा प्रश्न निर्माण होत असल्याचे सहाय्यक अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून 300 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी या ठिकाणी नव्याने टाकली. जवळपास दीडशे मीटर लांबीची केबल बदलण्यात आली. या कामाची राजेंद्र शर्मा यांनी स्वतः स्थळ पाहणी केली.
आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वीज वितरण कंपनीने या ठिकाणी उपाययोजना केल्या. आता या भागातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा होईल, असा विश्वास महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 7मधील कळंबोली सेक्टर 14 येथे विजेचा लपंडाव सुरू होता. येथील रहिवाशांच्या तक्रारी असल्याने आम्ही सातत्याने महावितरणकडे पाठपुरावा करत होतो. याबाबतीत स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातले. पक्षाचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील आणि मी संबंधित कार्यालय आणि अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला. शेवटी या ठिकाणची केबल बदलण्यात आली असून त्याची क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढवण्यात आली आहे. त्यामुळे केबल फॉल्ट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल आणि बत्ती गुल होण्याची समस्या जवळपास मार्गी निघेल.
-राजेंद्र शर्मा, माजी नगरसेवक, भाजप

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply