Breaking News

ई-पासचा सावळागोंधळ; नागरिकांचे तब्बल पाच लाख अर्ज नाकारले

पनवेल : बातमीदार

खासगी वाहनातून जिल्ह्याबाहेर प्रवास करणार्‍यांना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. कागदपत्रांचा अभाव, वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपूर्ण माहिती यामुळे ई-पास नाकारले जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत सात लाख 46 हजार 142 जणांनी ई-पासची मागणी केली होती, मात्र केवळ दोन लाख 27 हजार 988 जणांना पास देण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल पाच लाख ई-पास अर्ज नाकारले आहेत. ई-पासची सक्ती, तसेच भरमसाठ नियमानुसार अर्ज स्वीकारत असल्याने राज्य शासनाविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्याबाहेर खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे. ई-पासच्या मंजुरीसाठी कोविड 19 या संकेतस्थळावर जाऊ न अर्ज केल्यानंतर संबंधित विभागातील पोलिसांकडून तो अर्ज मंजूर केला जातो.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विभागाने 1 मेपासून ई-पास देण्यासाठी परिमंडळ एक आणि दोन हे वेगवेगळे भाग केले आहेत. त्यानुसर 23 मार्च ते 1 मेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरांतील दोन लाख 92 हजार 403 रहिवाशांनी ई-पाससाठी अर्ज केले होते. पैकी 81 हजार 894 रहिवाशांना मंजुरी देण्यात आली होती, तर एका पासबाबत निर्णय (पेंडिंग) झाला नव्हता. 1 मे नंतर परिमंडळ एक मध्ये दोन लाख 48 हजार 184 जणांनी अर्ज केले होते, पैकी 86 हजार 738 जणांचा अर्ज मंजूर झाले होते, तर 1 लाख 61 हजार 353  जणांना परवानगी नाकारण्यात आली होती. 93 अर्जाबाबत निर्णय झाला नव्हता. परिमंडळ दोन मध्ये 1 मे नंतर एक लाख 88 हजार 782 रहिवाशांनी ई-पास साठी अर्ज केला होता, त्यापैकी  एक लाख 34 हजार 279 बाद ठरले होते, तर 54 हजार 404 जणांना परवानगी देण्यात आली होती व 99 अर्ज प्रलंबित होते. 23 मार्च ते 27 ऑगस्टदरम्यान एकूण 561 अर्ज प्रलंबित राहिले आहेत. यात 1 मे पूर्वी 368 अर्ज प्रलंबित आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून 27 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत  एकूण सात लाख 46 हजार 142 जणांनी ई-पासची मागणी केली आहे. मात्र ई-पास देताना असलेल्या नियमात जे पात्र होतात त्यांनाच परवानगी देण्यात येत असल्याने केवळ दोन लाख 27 हजार 988 नवी मुंबईकरांना ई-पास देण्यात आलेले आहे.

ई-पास देण्यासाठी नियमावली ठरवण्यात आली होती. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रोगाने नातेवाइकाचे निधन झाले, कोणाचे जवळचे नातेवाइक अत्यवस्थ आहेत, स्वत:चा किंवा अति निकट नातेवाईकाचा विवाह आहे, आदी करणाव्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंचे वहन करणार्‍यांनाच ई-पास देण्यात येतात. मात्र अनेकदा अत्यावश्यक कारण नसताना अर्ज केले जातात. अत्यावश्यक काम  कागदपत्र देण्यात येत नाहीत, अशा विविध तांत्रिक कारणांनी ई-पासची परवानगी नाकारली जाते.

प्रवीणकुमार पाटील, उपयुक्त गुन्हे शाखा

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply