Breaking News

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी

विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पनवेल ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 11) दिली. या विमानतळाच्या धावपट्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
पनवेलजवळील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी धावपट्टीची शुक्रवारी चाचणी करण्यात आली. वायुदलाचे सी-295 हे विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानावर पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 विमानानेही यशस्वी फ्लायपास केला. लँडींग करणार्‍या सी-295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या चाचणीस केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह इकबाल चहल, लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे दशरथ पाटील, जे.डी. तांडेल, विनोद म्हात्रे, दीपक पाटील, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, उपायुक्त राहुल गेठे, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सी-295 विमान हे गांधीनगरहून, तर सुखोई हे पुण्यातून आले होते.
या वेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे. मार्च 2025मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगून सिडकोने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेचे नेतृत्व फायटरप्रमाणे करतात. एकही मोदी सबस पे भारी हे आपण हरियाणामध्ये आणि लोकसभेतही पाहिले. ते देशातील जनतेला सोबत घेऊन नेतृत्व करतात. आमचे महायुतीचे डबल इंजिनचे सरकार असल्याने काय फायदे होतात हे आज राज्यातील जनतेला कळले आहे. केंद्र सरकार आणि हवाई दलाकडून लागणार्‍या परवानग्या आम्हाला मिळाल्या, म्हणून आजचा दिवस उजाडला आहे.
हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्र उभारली जातील तसेच या विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आम्ही मागच्या काळात सुरू केले होते. आज त्याच्यावर टेस्ट लँडींग यशस्वीरीत्या झालेले आहे. हे काम आम्ही सुरू केले तेव्हा विरोधकांनी आमच्यावर टीका केली होती की, अशा प्रकारच्या घोषणा खूप होतात. त्यामुळे हे विमानतळ होणार नाही, पण आज याच्यावर टेस्ट लँडींग झाले असून त्याचा पहिला टप्पा पूर्ण होत लवकरच्या कमर्शियल विमानासाठी हे विमानतळ खुले होईल.

विकासाला चालना मिळणार -उपमुख्यमंत्री फडणवीस
नवी मुंबई विमानतळाच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दरवर्षी अंदाजे नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हे विमानतळ शिवडी-न्हावाशेवा सी लिंक मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडीमार्गाने जोडले जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे. यामुळे विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply