अहमदाबाद ः वृत्तसंस्था
किंग्ज पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 34 धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले आहे. या विजयासह गुणतालिकेत पंजाबचा संघ पाचव्या स्थानावर पोहचला आहे. पंजाबने पाच गडी गमवत 179 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते, मात्र बंगळुरूचा संघ आठ गडी गमवून 145 धावाच करू शकला. बंगळुरूचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद करून पंजाबच्या विजयात हरप्रीत ब्रारने मोलाची भूमिका बजावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पंजाबने दिलेल्या 180 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण दिसत होते. बंगळुरूला देवदत्त पडिक्कलच्या रूपाने पहिला धक्का बसला. रिले मेरेदिथच्या गोलंदाजीवर तो सात धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर हरप्रीतने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सला बाद केले. विराट कोहली 35 धावा करून तंबूत परतला. ग्लेन मॅक्सवेलही शून्यावर बाद झाला. एबी डिव्हिलियर्सही चांगली कामगिरी करू शकला नाही. विजयी अंतर कमी करण्यासाठी रजत पाटिदारने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला, मात्र उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्यानंतर शाहबाज अहमद आणि सॅमही परतले. हर्षल पटेलने 13 चेंडूंत 31 धावांची खेळी केली, मात्र विजयी अंतर खूप असल्याने त्याचा फायदा झाला नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बिश्नोईने त्याचा अप्रतिम झेल घेतला. पंजाबकडून हरप्रीतने चार षटकांत 19 धावा देत तीन गडी बाद केले. यात एक षटक निर्धाव टाकले.
तत्पूर्वी पंजाबचे पाच गडी बाद झाल्याने संघाची धावसंख्या मंदावली होती, परंतु के. एल. राहुल आणि हरप्रीत ब्रार यांनी सहाव्या गड्यासाठी चांगली भागीदारी केली. त्यामुळे पंजाबला 179 धावा करता आल्या. कर्णधार राहुलला बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात लय सापडली. त्याने 57 चेंडूंत 91 धावा कुटल्या. यात सात चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होते. राहुल आणि ख्रिस गेल यांनी दुसर्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. आक्रमक खेळी करणारा ख्रिस गेल 46 धावा करून बाद झाला. या खेळीत ख्रिस गेलने कायल जेमिसनच्या गोलंदाजीवर एका षटकात पाच चौकार ठोकले. त्याच्या आक्रमक खेळीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांवर दडपण आले होते, मात्र डॅनियल सॅमच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्सने यष्टीमागे त्याचा झेल घेतला. हरप्रीतने 17 चेंडूंत 25 धावा केल्या. त्यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले शाहरूख खान आणि दीपक हुड्डाही मैदानावर तग धरू शकले नाहीत. निकोलस पूरन आणि प्रभसिमरन सिंगही स्वस्तात बाद झाले. या सामन्यात पर्पल कॅपचा मानकरी असलेला हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत 53 धावा दिल्या. त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …