
कळंबोली : प्रतिनिधी
उरण पूर्व भागातील आवरे येथील स्व. छबीबाई गणपत गावंड सामाजिक संस्थेतर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या वेळी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार, फाईलचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला. या वेळी रा.जि.प शाळा कडापे या ठिकाणी आवरे गावातील नवनिर्वाचित सदस्य संतोष पाटील, माजी सदस्य अरुण गावंड, कुमार संदेश म्हात्रे, वत्सलाबाई व मान्यवरांच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आले. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आत्माराम गावंड व सुरेश गावंड यांनी आपल्या मातोश्री स्व. छबीबाई गणपत गावंड यांच्या पुण्यतिथीनिमित्त आवरे व कडापे गावातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप, 10 व 12 वीच्या उतीर्ण विद्यार्थांना महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी फाईल, पेऩसंच व गुणवंत विद्यार्थांचा शाल-श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्षाची शेकापची दादागिरी मोडीत काढत आवरे ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या रणरागिणी श्रीमती निराबाई सहदेव पाटील यांचा सत्कार उरण तालुक्याचे पाहिले तालुकाप्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम गावंड यांनी केला, तसेच नवनिर्वाचित सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान गावंड व अविनाश गावंड, शिवसेना शाखाप्रमुख सुनील ठाकूर, व युवासेना शाखा प्रमुख सुमित म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक केशव गावंड, सुधीर वारळकर यांच्यासह इतर शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिक, पालक व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन निर्भय म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गावंड, श्याम गावंड, दीपक गावंड, पुरुषोत्तम गावंड, बाळविंद्र म्हात्रे, सचिन केदारी, विशाल गावंड, गौरव गावंड यांनी मेहनत घेतली. माजी शिवसेना उरण तालुकाप्रमुख आत्माराम गावंड यांनी सर्वांचे आभार मानले.