पावसाळ्यात फुटला नागरिकांना घाम
पनवेल : वार्ताहर
पावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील नागरिकांना उन्हाचे चटके बसले. पुढील दोन-तीन दिवस हे वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात धो धो कोसळलेला मान्सून आता बर्यापैकी विश्रांतीवर आहे. राज्यात अद्यापही काही ठिकाणी पाऊस पडत असला तरी अनेक भागांत त्याने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर हवामानाने अचानक कूस बदलली असून, या बदलामुळे लोकांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला आहे. शुक्रवारीच चढत्या पार्याचा किंचित अनुभव आला होता. शनिवारी त्यात आणखी भर पडली. त्यामुळे दुपारी शरिरातून अक्षरश: घामाच्या धारा वाहू लागल्या.
ऊन आणि उकाड्याने चांगलाच घाम फोडला. दुपारी 12 वाजता पडलेले रखरखीत ऊन दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत कायम होते. या उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी छत्रीचा वापर केला, तर बाजारपेठांमध्येही विक्रेत्यांनी पावसाळ्यात वापरात येणारी छत्री शनिवारी उन्हापासून बचाव व्हावा म्हणून वापरल्याचे चित्र पहावयास मिळाले.